गुजरातमध्ये बसचा भीषण अपघात, 21 भाविकांचा मृत्यू तर 50 जण जखमी

गुजरात : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक वेदनादायक रस्ता अपघात झाला आहे. बनासकांठामधील अंबाजी येथील त्रिशुलिया घाटाजवळ भाविकांनी भरलेली बस उलटली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५१ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विटवर शोक व्यक्त केला आहे.

पीएम मोदी यांनी ट्वीट केले की, बनासकांठा दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्तहानी झाली आहे. या दु:खद घटनेत पीडितांच्या कुटूंबियांबद्दल मी संवेदना आणि सहानभूती व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे. लवकरच परिस्थिती सावरली जाईल.

बसमधील सर्व यात्रेकरू आनंद, नाडियाड आणि बोरसड येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व लोक अंबाजी मंदिराचे दर्शन घेऊन माघारी परत जात होते. जखमींना दांता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये ६५ हून अधिक भाविक होते.

अपघातानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी देखील ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “दांता रोडवरील त्रिसुलिया घाटात रस्ता अपघातामुळे जीवितहानी झाल्याने शोक होत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा. मी दिवंगत आत्म्यांसाठी प्रार्थना करतो.”

सायंकाळी साडेचार वाजता हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंबाजी मंदिराला भेट दिल्यानंतर भाविक बसमधून परतत असतानाच त्रिशूलिया घाटातून वळताना बस अचानक उलटली. घटनास्थळी पोलिस उपस्थित आहेत.

Visit : policenama.com