Coronavirus : देशातील ‘कोरोना’बाधित रुग्णांपैकी 20 % रुग्ण एकट्या मुंबईत, हॉटस्पॉटमध्ये वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 37336 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 1218 झाली आहे. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन वाढविण्याबरोबरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील जिल्ह्यांना तीन झोनमध्ये विभागले आहे. आरोग्य मंत्रालयाने ऑरेंज झोनमध्ये 284 तर 319 जिल्ह्यांचा ग्रीन झोनमध्ये समावेश केला आहे. तर 130 जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी पाहीली तर कोरोना विषाणूची लागण झालेल्या जिल्ह्यांची संख्या वाढली आहे. ही चिंतेची बाब आहे. 18 एप्रिल ते 1 मे या कालावधित कोविड-19 पासून प्रभावित झालेल्या जिल्ह्यांची सख्या 406 वरुन 475 झाली आहे. दरम्यान या काळाळात रेड हॉटस्पॉटमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. 1 मे पर्यंत कोरोना हॉटस्पॉट 170 वरुन 130 वर आले आहेत.

मागील पंधरा दिवसात ग्रीन झोनची संख्या देखील 353 वरून 319 झाली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सलग 21 दिवस कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही अशा जिल्ह्यांचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यांचा तीन विभागात विभागणी करताना सरकारने अनेक बारकावे तपासले आहेत. यामध्ये प्रथम जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या आणि या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी.

पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशची चिंता वाढली
उत्तर प्रदेशात सर्वाधिक 19 हॉटस्पॉट आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्रात 14, दिल्ली 12 आणि पश्चिम बंगालमध्ये 10 हॉटस्पॉट आहेत. तर तामिळनाडूमधील परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये 22 हॉटस्पॉट क्षेत्र होती आता त्यांच्यामध्ये घट झाली असून आता केवळ 12 हॉटस्पॉट आहेत. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशामध्ये चिंता वाढताना दिसून येत आहे. या ठिकाणी काही आठवड्यात हॉटस्पॉट जिल्ह्यांची संख्या वाढत आहे.

15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात नवीन हॉटस्पॉट नाहीत
15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हॉटस्पॉट जिल्हे नाहीत. यात आसाम, गोवा आणि हिमाचल प्रदेश या तीन प्रमुख राज्यांचा समावेश आहे. छत्तीसगड (रायपूर), झारखंड (रांची) आणि उत्तराखंड (हरिद्वार) येथे प्रत्येकी एक हॉटस्पॉट आहे. काही राज्यांमध्ये ग्रीन झोनमधील जिल्ह्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये आसाम 30, अरुणाचल प्रदेश आणि छत्तीसगड 25, मध्ये प्रदेश 24, ओडीशा 21 आणि उत्तर प्रदेशात 20 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.