श्रीलंका स्फोटानंतर २०० मौलानांना देशाबाहेर काढले, गृहमंत्र्यांची माहिती

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेमध्ये ईस्टर दिवशी झालेल्या हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने ६०० विदेशी नागरिकांसह २०० मौलानांना देशाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. गृहमंत्री वाजिरा अभयवर्धने यांनी ही माहिती दिली असून अनेक मौलाना देशात बेकायदेशीररित्या देशात आले होते. हल्ल्यानंतर त्यांच्या विजाची तारीख उलटली होती तरी ते देशात स्थायिक झाले होते. त्यंच्यावर दंड आकारून त्यांना देशाबाहेर काढण्यात आले आहे.

गृहमंत्री वजिरा अभयवर्धने यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या सुरक्षेसाठी वीजा प्रणालीचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर धार्मिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी विजाचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जेवढे लोक देशाबाहेर निष्कसित केले आहेत त्यापैकी २०० मौलाना आहेत. एवढेच नाही तर श्रीलंका सरकारने सामान्य नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या तलवारी, चाकू जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावेत. हत्यारे जमा करण्यासाठी नागरिकांना काही वेळ देण्यात आला आहे.

२१ एप्रिल रोजी श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेल्या स्फोटामध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला होता तर ५०० हून अधिक लोक जखमी झाले होते. यामध्ये काही मौलानांचाही हात होता. या घटनेनंतर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दोन आठवड्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पहिली ते पाचवीपर्य़ंतचे दुसरे सत्र १३ मेला सुरू होत आहे. मंत्री अकिला विराज करियावासम यांनी सांगितले की शाळेच्या नव्या सत्रापासून शाळा परिसरात एक विशेष सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे.