भुकंपाच्या मालिकेनंतर पालघरमध्ये २०० तंबू

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात एकामागोमाग एक भूकंपाच्या ६ धक्क्यांनी परिसर हादरला. भुकंपाच्या धक्क्यात घरातून बाहेर पडताना पडून एका चिमुरडीचा मृत्यु झाला. त्यानंतर शासनाला जाग आली असून आरोग्य विभाग आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील भुकंपप्रवण ४२ गावात २०० तंबू उभारण्यात येणार असून त्याचे साहित्यही आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात भुकंपाचे धक्के बसत आहेत. हे धक्के प्रामुख्याने २.९ ते ३.२ रेक्टर स्केलच्या दरम्यान असायचे. वारंवार भुकंप जाणवत असल्याने शासनाने या ठिकाणी भुकंप मापन केंद्र उभारले आहे. तेथे नियमितपणे भुकंपाच्या धक्क्याच्या नोंद होत आहे.

काल दिवसभरात भूकंपाच्या ६ धक्क्यांनी पालघर जिल्हा हादरला. भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारच्या दोन वाजेच्या सुमारास हलद पाडा इथं राहणारी वैभवी रमेश भूयाळ ही मुलगी भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातून बाहेर पडताना दगडावर आदळली. दगडावर डोके आदळून मार लागला होता. या जखमेत नाकातोंडात रक्त येताच आईने तसंच आजूबाजूच्या लोकांनी तलासरी ग्रामीण रुग्णालयामध्ये मुलीला उपचारासाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला.

पालघरला काल सकाळी ७ वाजता भूकंपाने पहिला तडाखा दिला. सर्व शांत होत नाही तोवर जमीन पुन्हा हादरली. या भूकंपाने पालघरकरांना अक्षरश: रस्त्यावर आणले. लोक दुकान, घरं सोडून रस्त्यावर आले. इतकचं काय शाळेवतील विद्याथीर्ही जीव मुठीत घेऊन मैदानात दाखल झाले.

आरोग्य विभाग आणि एनडीआरएफच्या टीमना रहिवासी भागात पाचारण करण्यात आले आहे. तसेच कच्च्या बांधकामाची घरं असलेल्यांना रात्री घराबाहेरच झोपण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. भुंकपाच्या धक्क्यांमुळे लोकांच्या घरांची पडझड होत असून शाळांच्या भींतींना तडे पडले आहेत.
शासनाकडून या भुकंपप्रवण ४२ गावांमध्ये नागरिकांच्या राहण्यासाठी २०० तंबू उभारण्यात येत आहेत. तसेच कच्च्या घरांमध्ये राहू नये असे शासनाने आवाहन केले आहे.

तलासरी आणि डहाणू तालुके गेल्या तीन महिन्यापासून भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भीतीने नागरिकांना रात्री-अपरात्री घराबाहेर अंगणात उघड्यावर झोपावे लागत आहे. आतापर्यंत १४ पेक्षा जास्त वेळा भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.