नंदुरबारमध्ये अडकलेले 2000 परप्रांतीय रेल्वेने रवाना

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे मागील दीड महिन्यांपासून अडकलेल्या परराज्यतील नागरिकांना घरी जाण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे नंदूरबार जिल्ह्यात अडकलेल्या बिहारमधील मजुरांना दोन विशेष रेल्वेगाडीने रवाना करण्यात आले. यात दरभंगा येथील 992 आणि सहरसा येथील 1 हजार 22 नागरिकांचा समावेश आहे.

लॉकडाउनमुळे बिहार येथील काही मजूर आणि जामिया संकुलातील विद्यार्थी जिल्ह्यात अडकले होते. या नागरिकांकडून घरी जाण्याची मागणी करण्यात येत असल्याने पालकमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी बिहारच्या सचिवांशी संपर्क साधून या नागरिकांना स्विकारण्याची विनंती केली. याबाबत 15 दिवसापासून पाठपुरावा सुरू होता. बिहार येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर बिहार प्रशासनाने मजूर आणि विद्यार्थ्यांंना स्विकारण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर रेल्वेद्वारे नागरिकांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन्ही रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाल्या. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून नायब तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकार्‍यांनी समन्वय साधला. सर्व प्रवाशांची नोंद घेण्यात आल्यानंतर सामाजिक अंतराचे पालन करून प्रवाशांना रेल्वेत बसविण्यात आले. बिहार प्रशासनाने सहकार्याची भूमिका दाखविल्याने आणि रेल्वेनेदेखील तातडीने सहकार्य केल्यामुळे या नागरिकांना त्यांच्या गावी पाठविणे शक्य झाले आहे.