कृषी कायद्याच्या विरोधात उद्या तब्बल 20 हजार शेतकर्‍यांचा नाशिक ते मुंबई भव्य वाहन ‘मोर्चा’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शनिवारी वीस हजार शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन आहे. हा मोर्चा नाशिक ते मुंबई असा मार्ग आहे. केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या अशा विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि निर्णायकरित्या अधिक व्यापक करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने भव्य वाहन मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा मोर्चा नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी (शनिवारी) २३ जानेवारीला या मोर्चाची सुरूवात होणार आहे. परत दुपारी शेकडो वाहने घेऊन जवळपास वीस हजार शेतकरी या वाहन मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. तर अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी.वाय.एफ.आय. ही युवक संघटना व एस.एफ.आय. ही विद्यार्थी संघटना महाराष्ट्रभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यांना घेऊन या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. नाशिक येथून सुरू झालेला हा वाहन मोर्चा ता. २३ शनिवारी सायंकाळी घाटनदेवी येथे रात्री मुक्कामास थांबणार आहे. दुसऱ्या दिवशी ता. २४ रविवारी सकाळी ९ वाजता घाटनदेवी येथून निघून २० हजार शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करतील.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मार्च २४ जानेवारी रोजी दुपारी सहभागी होईल. महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, नेशन फॉर फार्मर्स, आणि हम भारत के लोग या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला.

सोमवारी (ता. २५) आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता प्रचंड सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करणार आहेत. सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी २ वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील. तसेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवशी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामी, मोर्चास सांगता संपन्न होणार आहे.