मक्का मशिद बाँबस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदसह पाच आरोपी दोषमुक्त

हैदराबाद: वृत्तसंस्था
हैदराबादमधील मक्का मशिद येथे १८ मे २००७ मध्ये नमाज सुरु असताना बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये नऊ जणांचा मृत्यू तर ५८ जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण १६० साक्षीदार होते.

हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी दहा आरोपी होते. हे सर्वजण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत. स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी, लक्ष्मणदास महाराज, मोहनलाल रतेश्वर आणि राजेंद्र चौधरी हे आरोपी होते. या घटनेतील रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे दोघे अजूनही फरार आहेत.

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआयने ६८ प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला होता. यातील ५४ साक्षीदारांनी जबाब फिरवला आहे. सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर एप्रिल २०११ मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविला होता. या निकालानंतर एनआयएदेखील अयशस्वी ठरल्याचे दिसते.