निर्भया केस : फाशीच्या 3 दिवस आधी दोषी अक्षयनं दाखल केली नवीन दया याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2012 निर्भया गँगरेप आणि हत्या प्रकरणातील दोषी अक्षयने नवी दया याचिका दाखल केली आहे. नव्या याचिकेत अक्षयने म्हटले आहे की, त्याची पहिली याचिका फेटाळण्यात आली होती, ज्यामध्ये सर्व मुद्दे नव्हते. निर्भया गँगरेपमधील चारही दोषींना 3 मार्चला सकाळी मरेपर्यंत फासावर लटकवण्यासाठी सत्र न्यायालयाने नवे डेथ वॉरंट जारी केले आहे.

तर दोषी पवन कुमार गुप्ताच्या क्यूरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी सुनवाणी करणार आहे. पवनच्या याचिकेवर जस्टिस एन वी रमना यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. पवनने आपल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला जन्मठेपेच्या शिक्षेत बदलण्याची मागणी केली आहे.

पवनचे वकील एपी सिंह यांनी सांगितले की, त्यांचा आशील सुधारित याचिका दाखल करत आहे की, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ नये. पवन चारही आरोपींमध्ये एकमेव आहे, ज्याने अजूनपर्यंत सुधारित याचिका दाखल करणे आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचे पर्याय वापरलेले नव्हते.

दक्षिण दिल्लीत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री सहा लोकांनी चालत्या बसमध्ये निर्भयावर सामुहिक बलात्कार केला होता आणि तिला अतिशय निर्दयीपणे मारहाण करत जखमी करून बसमधून रस्त्यावर फेकले होते. निर्भयाचा नंतर 29 डिसेंबर 2012 ला सिंगापुरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या खळबळजनक गुन्ह्यातील सहा आरोपींपैकी एक राम सिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती, तर सहावा आरोपी अल्पवयीन होता. त्याला तीन वर्षासाठी बाल सुधारगृहात ठेवल्यानंतर 2015 मध्ये मुक्त करण्यात आले होते.