2020 : पाकिस्तनकडून ‘या’ वर्षी तब्बल 5 हजार 100 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू : पोलिसनामा ऑनलाईन – पाकिस्तनकडून भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असते. गेल्या वर्षी म्हणजेच सन २०१९ पेक्षा यावर्षी पाकिस्तनकडून तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. गतवर्षी पाकिस्तानाकडून ३ हजार २८९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.

दरम्यान, २०२० मध्ये पाकिस्तानाने केलेल्या गोळीबारात ३६ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जवान शहीद झाले आहेत. तर, १३० जण जखमी झाले आहेत.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात २६ नोव्हेंबर २००३ रोजी शस्त्रसंधीचा करार करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षात पाकिस्तानाकडून हा करार संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे, असे निरीक्षण नोंदवले जात आहे. २०२० मध्ये पाककडून तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वाधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षातील एकूण घटनांचा आढावा घेतल्यास सरासरी दिवसाला १४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच सन २०१९ मध्ये पाकिस्तानाकडून ३ हजार २८९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यापैकी ऑगस्ट २०१९ नंतर तब्बल १ हजार ५६५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यापूर्वी २०१८ मध्ये २ हजार ९३६ वेळा, तर २०१७ मध्ये ९७१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. जम्मूमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनात पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात १५ जवान शहीद झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

२००४ ते २००६ दरम्यान एकदाही गोळीबार नाही
२००४ ते २००६ या कालावधीत सीमाभागात एकदाही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले नसून याच काळात शस्त्रसंधी कराराचा प्रभाव दिसून आला. २००९ नंतर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. जम्मू, कठुआ, कुपवाडा, बारामुल्ला, सांबा, राजोरी, पूँछ जिल्ह्यात याचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. सीमेवरील ग्रामीण भागातील नागरिकांना तीन वेळा आपले घर-दार सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला.

दरम्यान, भारतीय जवानांकडून वेळोवेळी पाककडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जवानांच्या सुरक्षेसाठी १४ हजार ४०० बंकर तयार करण्यासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी ७ हजार ७७७ बंकर तयार असून, कठुआ, सांबा, जम्मू, राजोरी आणि पूँछ जिल्ह्यात उर्वरित बंकर तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.