Rashifal 2021 : नव्या वर्षात कोणत्या राशींना समस्या देणार केतू ? ‘या’ 6 राशीवाल्यांनी राहावे सावध

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष शास्त्रात केतूच्या गोचरकडे खूप महत्त्वपूर्ण घटनेप्रमाणे पाहिले जाते. 2021 मध्ये केतूचे गोचर कोणत्याही राशीत होणार नाही, परंतु यावर्षी आपले नक्षत्र परिवर्तन करताना फल आवश्य देईल. वर्षाच्या सुरुवातीला केतू बुध ग्रहाच्या अधिपत्याखालील ज्येष्ठा नक्षत्रात विराजमान होईल व वर्षाच्या मध्यापर्यंत राहील. नंतर 2 जूनला शनी ग्रहाचे नक्षत्र अनुराधामध्ये केतू प्रवेश करेल. ज्योतिषाचार्यांचे म्हणणे आहे की, मेष, सिंह, तूळ, धनू, वृश्चिक आणि कुंभ राशिवाल्यांना केतूपासून सांभाळून राहण्याची गरज आहे. 2021 मध्ये सर्व राशींवर केतूचा कसा परिणाम होईल ते जाणून घेऊयात…

मेष
केतू 2021 मध्ये आपल्या राशीपासून अष्टम भावात विराजमान असेल. मानसिक ताणात अचानक वाढ होईल. शारीरिक त्राससुद्धा होऊ शकतात. कार्यक्षेत्रात अनेक चढ-उतार जाणवतील. आर्थिक बाजूही कमजोर राहील. उत्पन्न कमी होईल. पैशाचे नुकसानदेखील शक्य आहे. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, तर त्यासाठी काळ चांगला आहे.

वृषभ
2021 मध्ये केतू तुमच्या राशीत सप्तम भावात विराजमान होईल. जानेवारी ते जून या काळात ज्येष्ठ नक्षत्रात विराजमान झाल्यानंतर केतू सामान्य फळ देईल. लव्ह लाइफमध्ये चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीबरोबर चांगले संबंध बनवाल. प्रेम विवाहाचे योग आहेत. संततीला यश मिळेल. व्यापार्‍यांना अंशतः लाभ मिळेल. केतू जूनच्या सुरुवातीला शनीचे नक्षत्र अनुराधामध्ये भ्रमण करेल, तेव्हा मानसन्मानाची प्राप्ती होईल.

मिथुन
केतू 2021 मध्ये आपल्या राशीत सातव्या स्थानात विराजमान असेल. जानेवारी ते जून या काळात ज्येष्ठा नक्षत्रात विराजमान झाल्यानंतर हा आरोग्याशी संबंधित समस्या देईल. काही खर्चांमध्ये वाढ होईल. आर्थिक जीवनात केलेल्या प्रत्येक वैयक्तिक प्रयत्नाला यश येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. मालमत्तेशी संबंधित वाद वाढू शकतात.

कर्क
केतू 2021 मध्ये तुमच्या राशीत पंचम भावात विराजमान असेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. संततीस आरोग्याच्या समस्या असतील. यावेळी अंशत: धनहानीचे योगही आहेत. संततीसाठी काळ चांगला नाही. तथापि, विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे, कारण त्यांना त्यांच्या शिक्षणात अंशतः यश मिळू शकते. भावंडांसाठी हा काळ चांगले फळ घेऊन येत आहे.

सिंह
केतू तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात विराजमान होईल. घरात तणावग्रस्त परिस्थिती राहील. आईला आरोग्याच्या समस्या त्रास देतील. कौटुंबिक वादांमुळे मानसिक तणाव वाढेल. घरगुती खर्चामध्येही वाढ होईल. काही कामामुळे घरापासून दूर जाऊ शकता. आर्थिक अस्थिरतेमुळे समस्या वाढू शकतात. तथापि, वर्षाच्या अखेरीस एखादी मालमत्ता विकून चांगली कमाई करू शकता.

कन्या
केतू 2021 मध्ये आपल्या राशीत तृतीय भावात विराजमान होईल. यावर्षी केतू नोकरी-व्यवसायात कोणतीही अडचण आणणार नाही. आर्थिक फायदा होईल. छोट्या-मोठ्या प्रवासाचे योगसुद्धा येतील. शत्रू सक्रिय होतील, परंतु त्यांचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. 2 जून रोजी केतू जेव्हा अनुराधा नक्षत्रात भ्रमण करेल तेव्हा प्रेमजीवनात अफाट यश मिळेल. अद्याप अविवाहित असाल तर एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.

तूळ
यावर्षी केतू तुमच्या राशीत द्वितीय भावात विराजमान होईल. केतू ज्येष्ठ नक्षत्रात विराजमान झाल्यानंतर आपल्या कौटुंबिक जीवनात वाद होईल. मानसिक ताणतणाव वाढतील. पैशामुळे घरात कलह होतील. 2 जून रोजी केतू जेव्हा अनुराधा नक्षत्रात भ्रमण करेल तेव्हा तुम्हाला मालमत्तासंबंधित अनेक बाबतीत यश मिळेल.

वृश्चिक
केतू यावर्षी आपल्याच राशीत म्हणजे लग्न भावात विराजमान होणार आहे. सुरुवातीपासून मध्यापर्यंत ज्येष्ठा नक्षत्रात केतूचे गोचर भरपूर मानसिक ताण देईल. पैसे वाचविण्यात अयशस्वी व्हाल ज्यामुळे खर्च वाढेल. आपण आपल्या अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. आपल्या बोलण्यातसुद्धा कटुता दिसून येईल. आरोग्य काहीसे कमजोर होऊ शकते. पुढील सहामाहीत स्थिती सुधारेल.

धनू
केतू तुमच्या राशीत बाराव्या स्थानात विराजमान असेल. वैवाहिक जीवनात प्रतिकूल परिणाम मिळतील. जोडीदारासाठी आरोग्याची समस्या शक्य आहे. खर्च वाढेल. तथापि, आपण व्यवसायात गुंतवणुकीचा विचार करीत असाल तर त्यासाठी काळ चांगला आहे. परंतु व्यवसायातून योग्य लाभ मिळण्याची थोडी कमतरता असेल. कामाशी संबंधित दुर्गम प्रवासदेखील करावा लागेल. आरोग्याच्या समस्या विशेषत: डोळ्यांचे विकार, झोपेची समस्या, पायाचे दुखणे आणि दुखापतीचे योग आहेत.

मकर
केतू तुमच्या राशीत अकराव्या स्थानात विराजमान असेल. केतू भाग्याची पूर्ण साथ देईल. उत्पन्नामध्ये अचानक वाढ होण्याचे योग आहेत. विरोधक आपल्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. केतूचे गोचर अनुकूल झाल्याने धनलाभाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल.

कुंभ
केतू तुमच्या राशीच्या दशम भावात विराजमान असेल. मध्यापर्यंत केतू ज्येष्ठ नक्षत्रात विराजमान असताना कार्यक्षेत्रातील अनेक चढ-उतारातून जावे लागू शकते. जे जातक नोकरी बदलण्याचा विचार करीत होते, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल नाही. वैवाहिक जीवनात संततीचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात विलंब आणि व्यत्यय येतील. केतू जेव्हा 2 जून रोजी अनुराधा नक्षत्रात भ्रमण करेल तेव्हा आर्थिकस्थिती बर्‍यापैकी सुधारेल.

मीन
केतू यावर्षी तुमच्या राशीत 9 व्या स्थानात विराजमान होत आहे. काही ना काही कारणास्तव कुटुंबापासून दूर जावे लागेल. दूरवरच्या प्रवासाला जाण्याचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी सामान्य असेल. वैयक्तिक आयुष्यात मान सन्मानातील काही कमतरता त्रास करेल. 2 जूनला केतू जेव्हा अनुराधा नक्षत्रात भ्रमण करेल तेव्हा आर्थिकस्थिती सुधारेल आणि उत्पन्न लक्षणीय वाढ होईल.