सांगलीत युवकाकडून 21 डीएसेलार कॅमेरे जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – महागडा कॅमेरा भाड्याने घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या युवकास अटक करण्यात आली. ऋत्विक नितीन शिंदे (वय 22, रा. समृद्धीनगर, कुपवाड) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून 8.50 लाखांचे 21 डीएसेलार कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मी मंदिर जवळ ही कारवाई केली. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी रेकॉडवरील गुन्हेगार, चोरटे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत.

सोहेल शर्मा यांनी दिलेल्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे पथक शहरात गस्त घालत होते. त्यावेळी लक्ष्मी मंदिर परिसरात एक युवक महागडे कॅमेरे स्वस्तात विकत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने कॅमेरे विकल्याची कबुली दिली.

ओळखीच्या लोकांकडून महागडे कॅमेरे भाड्याने घेऊन ते दुसऱ्या लोकांना विकत असल्याचे त्याने सांगितले. नंतर त्याच्या घरावर छापा टाकून 8.50 लाख रुपये किमतीचे 21 कॅमेरे जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, निलेश कदम, संदीप पाटील, बिरोबा नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.