Coronavirus Impact : भारतात 21 दिवसांचा ‘लॉकडाउन’, ‘फ्लिपकार्ट’नं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव बघता भारतात आपल्या सेवा तात्पुरत्या स्थगित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अ‍ॅपवर आपली माहिती दिली असून त्यासोबत एक संदेशही दिला आहे.

संदेशात म्हटले आहे की, ‘नमस्कार भारतीयांनो, आम्ही आमच्या सेवा तात्पुरत्या स्थगित करत आहोत. सध्याची परिस्थती फार बिकट आहे, पूर्वीप्रमाणे सध्याची परिस्थिती नाही. यापूर्वी कधीही सुरक्षित राहण्यासाठी समाजाला वेगळे ठेवण्याची गरज नव्हती. यापूर्वी कधीही घरी राहणे म्हणजे राष्ट्राला मदत करणे असे नव्हते. तुम्ही सुरक्षित राहावे म्हणून आम्ही तुम्हाला घरी राहण्याचा आग्रह करतो.’

भारतात २१ दिवसांचे लॉकडाउन
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करतांना देशभरात २१ दिवस देशव्यापी लॉकडाउन जाहीर केले. यानंतर गृहनिर्माण मंत्रालयाने लॉकडाऊन संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या, त्यात असे सांगितले गेले की या २१ दिवसांत काय मिळणार आणि काय नाही. तसेच कोणती दुकाने उघडी राहतील आणि कोणती बंद.

या सेवा सुरू राहतील
त्यात म्हटले आहे की, उचित किंमतीची दुकाने आणि अन्न, किराणा सामान, फळे, भाज्या, दुधडेअरी, मांस, मासे, पशुखाद्य यासंबंधी दुकाने खुली राहतील. मार्गदर्शक सूचनांनुसार बँका, विमा कार्यालये, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम खुले असतील. ई-कॉमर्सना अन्न, औषधे, वैद्यकीय उपकरणे पुरविण्यावरील बंदीमधून सूट देण्यात आली आहे.

लॉकडाउनमुळे व्ययसायांवर झाला परिणाम
वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट गेल्या काही दिवसांपासून आपल्या व्यवसायासंबंधित संघर्ष करत आहे, कारण विविध राज्यात लोकांच्या आणि वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध लागू होते. अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील, बिगबास्केट आणि ग्रोफर्स सारख्या इतर ईकॉमर्स पोर्टल्सना देखील अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे.