गायक सुरेश वाडकर, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवारांसह देशातील 21 जणांना पद्मश्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यात एकूण 21 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यातील 3 दिग्गज हे महाराष्ट्रातील आहेत. ज्यात गायक सुरेश वाडकर, राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार यांचा समावेश आहे.

जगदीश लाल आहूजा, मोहम्मद शरीफ, जावेद अहमद टाक, तुलसी गोडा, सत्यनारायण मुंदयूर, अब्दुल जब्बार, उषा चौमार, पोपटराव पवार, हरेकाला हजब्बा, अरुणोदय मंडल, राधामोहन आणि साबरमती, कुशल कोनवार शर्मा, त्रिनिती सावो, रविकन्नन, एस रामकृष्णन, सुंदरम वर्मा, मुन्ना मास्टर, योगी आर्यन, राहीबाई सोमा पोपेरा, हिम्मत राम भांभू, मोझ्झिकल पंकजाक्षी या 21 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, आता त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येईल. हिंदी, मराठीसह त्यांनी भोजपुरी आणि कोकणी भाषेत देखील हजारो गाणी गायली आहेत. आज याचाच गौरव करत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पद्मश्रीच्या रुपात सुरेश वाडकर यांच्या स्वरमय कारकिर्दीचा सन्मान करण्यात आला आहे.

तसेच राहीबाई पोपेरे यांना बीजमाता म्हणून ओळखले जाते. देशी बियाणांचे जतन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या सन्मान होणार आहे. तर पोपटराव पवार यांनी आपले दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेले गाव हिवरेबाजार दुष्काळमुक्त केले. हिवरेबाजार या गावचे माजी सरपंच असलेल्या पोपटराव पवार यांनी त्याच्या दुष्काळी गावाचा कायापालट केला. याच कारणाने त्यांना सरकारकडून पद्मश्रीने गौरवण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –