Pune : 21 वर्षीय ‘राजश्री’चा मृत्यू ! 2 डॉक्टरांना 10 वर्षाची शिक्षा, भूल तज्ञाची निर्दोष मुक्तता, कोर्टाकडून सरकारी वकिलांचे ‘कौतुक’, जाणून घ्या प्रकरण

पुणे( Pune ) : पोलिसनामा ऑनलाइन – सिझेरियन ऑपरेशन करण्याचा अधिकार नसतानाही ते करताना महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्यातील 2 डॉक्टरांना न्यायालयाने (Court) दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दंड सुनावलं आहे. तर भूल तज्ञ डॉक्टरांची निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश विक्रम राजाराम जगदाळे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे यावेळी न्यायालयाने (Court) सरकारी वकिलांचे विशेष कौतुक देखील केले आहे.

डॉ. जितेंद्र शिंपी (वय 40) व सचिन हरी देशपांडे (वय 39) अशी शिक्षा सूनावलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. तर भूल तज्ञ डॉ. विजय अगरवाल यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या घटनेत राजश्री अनिल जगताप (वय 21) या विवाहितेचा मृत्यू झाला होता. याबाबत तिचे पती अनिल जगताप यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार तिघां डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2012 साली हा प्रकार घडला होता.

डॉ. शिंपी यांचे देहूरोड परिसरात रुग्णालय होते. डॉ. सचिन देशपांडे हे देखील तेथे काम करत होते. दोघांचेही वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेले आहे. तर त्यांनी आयुर्वेदिक डिग्री घेतली आहे. त्यांना नियमानुसार सिझेरियन करण्याचा अधिकार नाही आणि त्याचे शिक्षण देखील झालेले नाही.

दरम्यान, फिर्यादी अनिल जगताप हे रुग्णवाहिकेवर चालक आहेत. त्यांची पत्नी गरोदर होती. त्यांना यापूर्वी एक मुलगी होती. तिच्या बाळंतपणा वेळी देखील दुसऱ्या रुग्णालयात सिझर झाले होते. दुसऱ्या वेळेस त्या गरोदर राहिल्यानंतर त्या डॉ. शिंपी यांच्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना डॉ. शिंपी यांनी सीझर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पूर्ण प्लॅनिंगने सीझर करण्याचे ठरले. त्यांना सीझर करण्याचा दिवस देखील रुग्णालयाने ठरविला व जगताप यांना सांगितले.

यानुसार त्या सीझर करण्यासाठी भरती झाल्या. तसेच यावेळी त्यांचे फॅमिली प्लानिंगचे देखील ऑपरेशन करण्यात येणार होते. पण सीझर करत असताना डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला आणि त्यांची अचानक तब्बेत बिघडली. यावेळी राजश्री यांना त्याच अवस्थेत त्यांना खासगी वाहनातून झोळीत दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण याकालावधीत राज्यश्री यांचा रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाला आणि त्यांचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास केला.

न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन्ही डॉक्टरांना 10 वर्ष सक्षम कारावास व प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दोन्ही डॉक्टरांचे शिक्षण झालेले नसताना त्यांनी सीझर ऑपरेशन केल्याचे म्हंटले आहे. न्यायालयाने केसचा निकाल देताना सरकारी वकील राजेश कावेडिया यांचे विशेष कौतुक करत “असे वकील न्यायालयाची संपती आहेत”  असे म्हंटले आहे.