राज्य पोलीस दलात आता 2144 पदांची भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुक कोंडीच्या प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी 2144 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 3 उपायुक्त, 6 उपअधीक्षकांसह 27 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत सर्वाधिक 620 पदे भरण्यात येणार आहेत. गृह विभागाने नुकत्याच घटकनिहाय पदाच्या वाटपाला हिरवा कंदील दाखविला आहे.

उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनेनुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी जागांची निर्मिती केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठांकडून सांगण्यात आले. 2013 मध्ये उच्च न्यायालयात वाहतूक कोंडीच्या समस्येवर ठोस कारवाई करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ती निकालात काढताना न्यायालयाने राज्य सरकारला विविध उपाययोजना सुचवल्या होत्या.

उच्च न्यायालयाने वाहतुक शाखेसाठी स्वतंत्र पदाची निर्मीती करण्याची सुचना दिली होती. त्यांच्याकडून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे सोडून दिलेली, बेवारस वाहने हटवणे या जबाबदाऱ्या प्रामुख्याने सोपविण्यात येणार आहे. न्यायालयाने सुचविलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील विविध वाहतुक शाखांकरिता एकूण विविध दर्जाची 2144 पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव यावर्षी 23 जानेवारीला गृह विभागाला सादर केला होता.

नव्याने निर्माण करण्यात येणारी सवर्गनिहाय पदे
पद संख्या
अधीक्षक -1
उपअधीक्षक -6
निरीक्षक – 27
सहायक निरीक्षक – 63
उपनिरीक्षक – 108
सहायक फौजदार – 126
हवालदार – 379
शिपाई – 1143
चालक शिपाई – 289

Visit : Policenama.com