अझीम प्रेमजी यांच्याकडून रोज करण्यात येते ‘एवढ्या’ कोटींचे दान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या संस्कृतीत ‘जोडोनिया धन। उत्तम वेव्हारे। उदास विचारे। वेंच करी॥’ असे एक संतवचन आहे. बिल गेट्स 9 Bill Gates) यांच्यापासून आपल्या देशातील अझीम प्रेमजी ( Azim Premji) यांच्यापर्यंत अनेक धनकुबेर उद्योजकांनी हे संतवचन आपल्या जीवनात सिद्ध केले आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी ‘विप्रो’चे ( Vipro) मालक असलेल्या अझीम प्रेमजी यांनी ॲडलगिव्ह हुरुन इंडिया’च्या 2020 च्या परोपकारी व्यक्तींच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. अझीम प्रेमजी यांच्याकडून दररोज 22 कोटी रुपयांचे दान करण्यात येते.

ॲडलगिव्ह हुरुन इंडिया यांच्याकडून हि यादी जाहीर करण्यात आली. ही भारतातील सर्वाधिक दानशूर व्यक्तींची सातवी वार्षिक क्रमवारी आहे. देशातील दात्यांना समोर आणण्याच्या उद्देशाने ही यादी प्रसिद्ध करण्यात येते. 2020ची यादी हि लोकांनी दान केलेली गणना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत केलेल्या पाच कोटी रुपयांहून अधिक रोकड किंवा रोकड सममूल्य दानावर आधारित आहे. लोककल्याणासाठी दान करणाऱ्या या भारतीयांच्या यादीत एकूण 112 लोकांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी यामध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या यादीमध्ये अझीम प्रेमजी यांना पहिले स्थान मिळाले आहे. त्यांनी २०२० मध्ये एकूण 7,904 कोटी रुपये दान केले आहेत.याचा अर्थ ते रोज सुमारे सरासरी 22 कोटी रुपये दान करतात. तर या यादीत दुसऱ्या स्थानी एचसीएल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष शिव नडार ( Shiv Nadar) यांचा समावेश आहे. भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ( Mukesh Ambani) यांना या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. मुकेश अंबानी यांच्या तुलनेत अझीम प्रेमजी यांनी १७ पट अधिक दान दिले आहे.आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला ( Kumar Manglam Birla ) आणि वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल ( Anil Agrwal) हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.