‘पीएम केअर्स’साठी शैक्षणिक कर्मचार्‍यांच्या वेतनातून 22 कोटी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवोदय शाळांपासून ते आयआयटी, आयआयएम व केंद्रीय विद्यापीठांपर्यंतच्या शैक्षणिक संस्थांनी पीएम केअर्स निधीसाठी 21.81 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यापैकी बहुतांश रक्कम कर्मचार्‍यांच्या वेतनातून देण्यात आले आहे. निधीचे व्यवस्थापन करणार्‍या पंतप्रधान कार्यालयाने शैक्षणिक संस्थांकडून मिळालेल्या निधीचे तपशील देण्यास नकार दिला आहे. ‘पीएम केअर्स फंड’ हा आरटीआय कायद्याच्या कक्षेत येणारी ‘पब्लिक अ‍ॅथॉरिटी’ नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

कोरोना उपाययोजनांसाठी पीएम केअर्स निधीची स्थापना करण्यात आली होती. 31 मार्चला त्यामध्ये 3076.62 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती व त्यातील 3075.85 कोटी रुपये ‘ऐच्छिक योगदान’ असल्याचे अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. अनेक शैक्षणिक संस्थांनी व नियामकांनी दिलेले ‘ऐच्छिक योगदान’ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वेतनातून आले आहे. त्यामध्ये काही प्रकरणांमध्ये ते निवृत्तीवेतनधारक आणि विद्यार्थ्यांकडूनही मिळाले आहे.

नवोदय विद्यालय समितीचे मुख्यालय व सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयांनी ‘कर्मचार्‍यांकडून योगदानापोटी’ 7.48 कोटी रुपये दिले. ही समिती ग्रामीण भागात 600 हून अधिक नवोदय विद्यालये चालवते. 11 केंद्रीय विद्यापीठांनी 3.39 कोटी रुपयांचे योगदान दिले. यापैकी अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे सर्वाधिक, म्हणजे 1.33कोटी रुपये, बनारस हिंदू विद्यापीठाचे 1.14 कोटी, तर दिल्लीच्या केद्रीय संस्कृत विद्यापीठाचे 27.38 लाख रुपये आहेत. 20 राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांनी (आयआयटी) 5.47 कोटी रुपयांचे योगदान दिले. यापैकी आयआयटी खडगपूरचे सर्वाधिक 1 कोटी रुपये आहेत, तर आयआयटी कानपूरने 47.71 लाख रुपये या निधीसाठी दिले आहेत.