Coronavirus : इराणमधून आलेले 22 भाविक अडकले महाराष्ट्रात, पैसे संपल्याने होताहेत ‘हाल’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनालाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस या रोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 42 वर पोहचली असून याचा फटका इराणमधून आलेल्या 22 भाविकांना बसला आहे. अहमदनगरमध्ये मागील महिन्यात अवतार मेहेरबाबा यांच्या अमरतिथी दर्शनासाठी 22 इराणी आणि जपानी नागरिक आले होते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे हे भाविक नगरमध्येच अडकून पडले आहेत. त्यांच्याकडील पैसे संपल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

मेहेरबाबा यांच्या दर्शनासाठी आलेले हे भाविक मागील दोन महिन्यापासून अहमनगरमध्ये आहेत. दरम्यान त्यांना या महिन्यात इराण आणि जपानला परतायचे होते. मात्र, कोरोनामुळे त्यांचे विमान आणि व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना इराण आणि जपानमध्ये जाता येत नसल्याने त्यांची गोची झाली आहे. त्यांच्याकडे असलेले पैसे देखील संपले असून सध्या त्यांचे हाल होत आहेत. अहमदनगर जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने भाविकांचे हाल होत असल्याची तक्रार मेहेरबाबा येथील नागरिकांनी बोलून दाखवली आहे.

भाविकांचा व्हिसा जोपर्यंत असतो तोपर्यंत मेहेरबाबा मंदिर प्रशासनाकडून भाविकांना मदत केली जाते. मात्र, आता व्हिसा संपला असून जिल्हा प्रशासन या विदेशी भाविकांकडे लक्ष देत नाही. या भाविकांना मंदिर प्रशासनाने राहाण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. तर या ठिकाणच्या काही सामाजिक संस्थांनी त्यांना किराणा माल उपलब्ध करून दिला आहे.