Jhunjhunu : 31 लाखाच्या कर्जाचे दिले 62 लाख अन् 22 वर्षीय युवकानं दिला जीव, 3 पानी लिहीली ‘सुसाईड’ नोट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील रामलालपुरा गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 22 वर्षांच्या मुलाने विषारी पदार्थाचे सेवन करून जीव दिला. सुसाईड नोटमध्ये कर्जाचा संदर्भ देत अनेक लोकांवर छळ केल्याला आरोप त्याने केला आहे. घटनास्थळावरून सापडलेली तीन पानांची सुसाईड नोट व आत्महत्या करणाऱ्या मुलाचे वडील बंटीराम यांच्या रिपोर्टनुसार चार जणांविरूद्ध आत्महत्या करण्यासाठी भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आत्याच्या घरी राहत होता विकास
झुंझुनू जिल्ह्यातील गुधा गोरजी पोलिसांच्या म्हणण्यानुसार रामलालपुराचा विकास अनेक वर्षांपासून सिथल या गावी त्याच्या आत्याच्या घरी राहत होता. दरम्यान गेल्या रात्री विकासने विषारी पदार्थाचे सेवन केले होते, त्यामुळे रात्री उशिरा त्याची प्रकृती खालावली. आत्याचा मुलगा संदीपने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. जेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

व्याजासाठी देत होते त्रास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाच्या खिशात तीन पानांची सुसाइड नोट सापडली आहे, ज्यात त्याने लिहिले आहे की त्याने विजय सिंगरा नामक व्यक्तीकडून 31 लाख रुपये उधार घेतले आहेत. त्या बदल्यात त्याने 62 लाख रुपये दिले आहेत. असे असूनही त्याला व्याजासाठी त्रास दिला जात होता.

दहा रुपये शेकडा व्याज
त्याने यात लिहिले आहे की सासरच्या लोकांसमोरही त्याला बदनाम करण्यात आले होते. व्याज न दिल्यास त्याला जिवे मारण्याची धमकीही दिली जात होती. सुसाईड नोटमध्ये असेही सांगितले गेले होते की, कर्ज देणारा त्याच्याकडून व्याज म्हणून 10 रुपये शेकडाच्या हिशोबाने व्याज आकारत होता. तर त्याने आपल्या कुटुंबीयांना 2 रुपये शेकडा व्याज असल्याचे सांगितले होते.