संतापजनक ! 22 वर्षीय तरुणीला 8 महिने डांबून ठेवून केला बलात्कार, अन्…

बरनाला : पोलीसनामा ऑनलाईन –   एका 22 वर्षीय तरुणीला तब्बल आठ महिने डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना पंजाबमधील बरनाला जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाचा नेत्याचाही समावेश आहे. तसेच तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

या प्रकरणी पीडितेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 24 जून रोजी त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहणारी महिला बहिणीला फूस लावून एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भावाच्या घरी घेऊन गेली. त्यावेळी नेत्यासोबत एक भोंदू बाबा आणि काही महिलांसह 20 ते 25 जण तिथे उपस्थित होते. त्याठिकाणी तिला पिण्यासाठी शीतपेय दिले. ते प्राशन केल्यानंतर बहीण बेशुद्ध झाली. त्याच दिवशी तिच्यावर त्या नेत्याने आणि काही जणांनी बलात्कार केला. बहिणीला 17 दिवस बरनाला जिल्ह्यातील पंधेर गावात डांबून ठेवले. त्यानंतर बठिंडा येथे घेऊन गेले. तिथे जबरदस्ती तिचे लग्न लावून दिले. लग्नाच्या बदल्यात आरोपींनी 70 हजार घेतले होते. या प्रकरणी बरनाला येथे तक्रार नोंदवली. पण तेथील पोलीसांनी पैसे मागितले. तसेच बरनाला पोलीस विभागातील 3 कर्मचाऱ्यांनी बहिणीला धमकावल्याचे भावाने म्हटले आहे. बहिणीला बठिंडामध्ये तीन लाखांना विकणार असल्याची चर्चा सुरू होती. ते तिने ऐकले आणि कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. तिने आपल्या आईशी संपर्क साधला. तिला घेण्यासाठी गेलो असता, ती नशेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर बहिणीला सरकारी रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच कोर्टात तिचा जबाब नोंदवण्यात आला. पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांनी धमकावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच आमच्या जीवाला धोका असल्याचे सांगून संरक्षण देण्याची विनंतीही केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.