Coronavirus : राज्यात 48 तासात 222 पोलिस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 24 तासात 3 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 2,30,599 वर पोहोचली आहे. राज्यातील पोलिसही मोठ्या संख्येने कोविड – 19 च्या कचाट्यात सापडले आहेत. गेल्या 48 तासांत महाराष्ट्रातील 222 पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. यासह मागील 24 तासात 3 पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. आतापर्यंत 5935 पोलिसांना महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 74 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात 4715 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी कोविड -19 ची 6,875 प्रकरणे समोर आल्यानंतर त्याची एकूण प्रकरणे वाढून 2,30,599 वर पोहोचली आहे. तर आणखी 219 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा एकूण आकडा 9,667 वर पोहोचला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. आरोग्य विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बरे झालेल्या 4,067 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्यात एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1,27,259 झाली आहे. विभागाने म्हटले आहे की, राज्यात सध्या 93,673 सक्रिय प्रकरणे आहेत. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आतापर्यंत 12,22,487 लोकांची कोविड -19 साठी चाचणी करण्यात आली आहे. त्याच वेळी, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई मध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1268 रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 89,124 वर गेली आहे. मुंबईत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 5132 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी मुंबईतील झोपडपट्टी, धारावी येथे कोरोना विषाणूच्या नव्या नऊ प्रकरणानंतर संक्रमित लोकांची संख्या 2347 वर पोहोचली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून झोपडपट्टी भागात मृतांचा आकड्याबाबत माहिती देणे बंद केले आहे. महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, धारावी येथे सध्या 291 सक्रिय रुग्ण आहेत, तर 1,851 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. एकेकाळी संसर्गाच्या चपळ्यात सापडलेल्या धारावीमध्ये दादर आणि माहीमपेक्षा कोविड – 19 चे प्रमाण कमी आहे.