Coronavirus : राज्यात आतापर्यंत तब्बल 227 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण तर तिघांचा मृत्यु , बाधितांपैकी 65% मुंबईचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईसह राज्यात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनापासून नागरिकांनी दूर राहावे, यासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलीस दलातील या कोरोना योद्धांना आता कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील किमान २२७ पोलिसांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

या २२७ पैकी ३० पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. आतापर्यंत मुंबईतील ३ पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यु झाला आहे. कोरोना बाधित पोलिसांपैकी ६५ टक्के पोलीस हे एकट्या मुंबईतील आहेत. तसेच मुंबईत बंदोबस्तांवर आल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये परत गेलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यात पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक २ मधील ३, दौंड येथील गट क्रमांक  ८ मधील ८ जवान कोरोना बाधित झाले आहेत. याशिवाय हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दलातील जवान कोरोना बाधित झाले आहेत.

मालेगाव हा हॉटस्पॉट झाला असून तेथे २७५ कोरोना बाधित आहेत. त्यापैकी ४६ पोलीस कर्मचारी आहेत.
मुंबईतील एकूण ६ पोलीस वसाहती सील करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातील एका पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी नशेच्या गोळ्या विकणार्‍या एका आरोपीला अटक केली होती. तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने संपूर्ण पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा र्‍  यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुण्यातील एका पोलीस ठाण्यातील ६ पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले असून या पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.