राज्याच्या जल आराखड्यात कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी २३.६६ टीएमसी पाण्याची तरतूद

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यास राज्य जल परिषदने अंतिम मान्यता दिली असून त्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी २३.६६ टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आल्याबदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण अधिनियम २००५ कलम १६ (४) मधील तरतुदीनुसार राज्य जल परिषदेने अंतिम मान्यता दिली असून जल आराखड्यास वैधानिक दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जुलै २०१८ च्या विधीमंडळाच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी २३.६६ अघफू पाण्याची तरतूद करण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना भेटून निवेदनाद्वारे मागणी केली होती.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मराठवाड्यातील कायम दुष्काळी भागासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील कृष्णा खो-यामधील एकूण १ लाख १४ हजार ७३१ हेक्टर अवर्षणप्रणव क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. गंभीर चुकीच्या नियोजनामुळे जवळपास रद्दबातल ठरत असलेल्या या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यामुळे व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रयत्नाने पाणी उपलब्धता प्रमाणपत्रच नसलेल्या या प्रकल्पास सिंचन घोटाळ्याच्या चौकशी समितीतून दोषमुक्त करून घेऊन पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळविले, पर्यावरण मान्यता नसल्याने केंद्रीय पर्यावरण विभागाने प्रस्तावित केलेली कारवाई थांबवून केंद्राची पर्यावरण मान्यता मिळविली, लवादाची पाणी मान्यताच नव्हती ती पहिल्या टप्प्यात ७ टीएमसी पाणी मान्यता मिळवून कामांचा प्राधान्यक्रम ठरवून या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन झाले असून प्रथम टप्प्यातील ७ टीएमसी मर्यादेमध्ये भरीव निधीमुळे नीरा भीमा बोगदा व जेऊर बोगद्याचे काम गतीने प्रगतीपथावर आहे.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या योजनेस अनुज्ञेय असलेले द्वितीय टप्प्यातील १६.६६ टीएमसी पाणी मिळणे बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ७ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य जल परिषदने अंतिम मान्यता दिलेल्या राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यात कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी २३.६६ अ. घ. फू. पाण्याची तरतूद करावी म्हटले आहे. याबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us