हिंदूराव हॉस्पिटलमधून 23 कोरोना रुग्णांनी ठोकली धूम, दिल्लीत प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   राजधानी दिल्लीत कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केजरीवाल सरकार विविध उपाययोजना करत आहे. मात्र असे असतानाच उत्तर दिल्ली महापालिकेच्या हिंदू राव हॉस्पिटलमधून गेल्या पंधरा दिवसात 23 कोरोनाबाधित रुग्णानी पोबारा केला आहे. यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.

एनडीएसीचे महापौर जय प्रकाश यांनी सांगितले की, उत्तर दिल्ली महापालिकेच्या हिंदू राव हॉस्पिटलमधून 19 एप्रिल ते 6 मे दरम्यान 23 कोरोना रुग्णांनी पोबारा केला आहे. काही रुग्ण भरती झाल्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता इतरत्र चांगल्या सुविधा मिळत असल्याने निघून जातात. हॉस्पिटलमधून 23 रुग्ण पळालेत ते कुठे गेलेत याची कल्पना नाही. दिल्लीत गरीब आणि सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळणे अवघड आहे. दिल्लीतील अनेक पंचतारांकित रुग्णालयांत रुग्णाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्याकडे लाखो रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? या गोष्टी तपासूनच रुग्णाला भरती केले जाते. अनेक रुग्णांकडे हेल्थ इन्शुरन्स असला तरी त्यांना खासगी रुग्णालयात आगाऊ लाखो रुपये भरावे लागतात. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. कोरोना रुग्णांना भरती करण्यासाठी लाखो रुपये मागण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयांसाठी कोणतेही बंधन नसल्याची व्यथा अ‍ॅड. अभय गुप्ता यांनी सांगितली आहे.