भारतात आज देखील माणुसकी हाच मोठा धर्म ! कॉन्स्टेबल सय्यद ताहिरनं दाखवलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लॉकडाउनमध्ये नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढलेला असल्यामुळे लॉकडाउन वाढवला जाण्याचीही शक्यता आहे. सध्याच्या खडतर काळात पोलीस आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. काही भागांमध्ये पोलीस आणि डॉक्टरांवर हल्लेही होत आहेत. पण यातही सर्व कर्मचारी कर्तव्य निभावत काम करत आहेत. तामिळनाडूमधील 23 वर्षीत पोलीस कॉन्स्टेबल सय्यद अबु ताहिरने एका छोट्याश्या कृतीमधून भारतात आजही माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे हे दाखवून दिले आहे.

तामिळनाडूमधील त्रिची मध्ये राहणार्‍या एका गर्भवती महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्यामुळे तिला सिव्हील रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल व त्यासाठी रक्ताची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्या पत्नी आणि बाळाचा प्राण वाचवण्यासाठी हा व्यक्ती रस्त्यावर लॉकडाउनची पर्वा न करता उतरला. अनेक ठिकाणी नकार पदरात पडल्यानंतर, रस्त्यावर फिरत असताना सय्यद ताहिर यांची नजर महिलेच्या पतीवर पडली. चौकशी केल्यानंतर, सय्यद यांनी तुम्हाला जो ब्लडग्रुप हवा आहे, तोच माझा आहे. मी रक्त देतो, असे आश्वासन महिलेच्या पतीला दिले. शब्द दिल्याप्रमाणे सय्यद यांनी रुग्णालयात जात रक्त दिल्यानंतर महिलेचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले आहे. त्यामुळे आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत.