Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे पुन्हा 23 हजारांपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, 448 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव गेल्या 2 दिवसांपासून चांगलाच वाढला असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 23446 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात 448 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 14 हजार 253 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 9 लाख 90 हजार 795 वर जावून पोहचली आहे. आतापर्यंतची सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 7 लाख 815 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या राज्यामध्ये 2 लाख 61 हजार 432 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळं 28 हजार 282 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट हा 70.72 टक्के एवढा आहे. राज्यातील कोरोना रूग्णांचा मृत्यू दर हा 2.85 टक्के एवढा आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या 49 लाख 74 हजार 588 सॅम्पलपैकी 9 लाख 90 हजार 795 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात तब्बल 16 लाख 30 हजार 701 लोक हे होम क्वारंटाईन आहेत तर 38 हजार 220 लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.