Coronavirus : राज्यात 2345 नवे ‘कोरोना’चे रुग्ण तर 64 जणांचा मृत्यू, बधितांचा आकडा 41000 पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनाचे 2345 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 हजार 642 झाली आहे. तर 24 तासामध्ये कोरोना बाधित 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या 1454 झाली आहे. मुंबईतली रुग्णसंख्या 22 हजार 500 इतकी झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गुरुवारी (दि.21) राज्यात 1408 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 11 हजार 726 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यात सध्या 28 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 64 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईत 41, मालेगाव 9, पुणे 7, औरंगाबाद 3, नवी मुंबई 2, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात मृत्यू झालेल्या 64 रुग्णांमध्ये 36 पुरुष आणि 28 महिलांचा समावेश आहे. या मृत्यूपैकी 60 किंवा त्यावरील वयाचे 31 रुग्ण होते. तर 29 रुग्ण हे 40 -59 वयोगटातील होते. 4 रुग्ण हे 40 वर्षापेक्षा कमी वयोगटातील होते. मृत्यू झालेल्या 64 रुग्णांपैकी 38 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार आढळून आले आहेत.