एका दिवसात 2 हजार 371 मुंबईकरांना ‘कोरोना’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे. त्यामुळे दिवसेदिवस रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. मुंबईत होत असलेली रुग्णवाढ पालिकेसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. काल दिवसभरात 2 हजार 371 जण कोरोनाबाधित झाले, तर 38 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 63 हजार 116 वर पोहोचली आहे. त्यामुळे आतापर्यंत 8 हजार 20 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काल मृत्यू झालेल्या 38 पैकी 31 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 26 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश असून दिवसभरात 1 हजार 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 28 हजार 112 वर पोहोचली आहे. आता मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये 26 हजार 632 सक्रिय रुग्ण दाखल आहेत. इमारतींमधील रहिवाशांना कोरोनाची बाधा होत असल्याचे निदर्शनास आले आल्यामुळे 7 हजार 528 इमारती बंद करण्यात आल्या आहेत. तर मोठया संख्येने करोनाबाधित रुग्ण सापडल्याने 544 ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.