वीर धरणाच्या 5 दरवाजातून नीरा नदीत 23920 क्युसेकने विसर्ग

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन ( मोहंंम्मदगौस आतार ) – गेल्या काही दिवसांपासून नीरा खो-यातील चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत राहिल्याने वीर धरण अखेर गुरूवारी (दि.१३) दुपारी ९९.६३ टक्के भरून १०० टक्के
भरण्याच्या स्थितीत आहे. परिणामी गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता वीर धरणाचे पाच दरवाजे चार फुटाने उचलून २३ हजार १२० क्युसेक्स व विद्युत गृहातून ८०० क्युसेक्स प्रतिसेकंदाने वेगाने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. त्यामुळे या हंगामात नीरामाई प्रथमच खळखळून वाहू लागली आहे. नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरण परिसरात गुरूवारी (दि.१३) सकाळ पर्यंत ११०९ मि.मी. पाऊस पडल्याने ७.२० टि.एम.सी. इतका पाणीसाठा झाला असून धरण ६१.४५ टक्के भरले आहे. भाटघर धरण परिसरात ५२१ मि.मी. पाऊस पडल्याने १७.३२ टि.एम.सी. इतका पाणीसाठा झाला असून धरण ७३.७२ टक्के भरले आहे.

वीर धरण परिसरात ३६५ मि.मी.पावसाची नोंद झाली असून ९.५० टि.एम.सी. इतका पाणीसाठा झाला असून धरण ९९.६३ टक्के भरले आहे. तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२२७ मि.मी पाऊस झाला असून ३.३२ टि.एम.सी. इतका पाणीसाठा झाला असून धरण ९०.०३ टक्के भरले आहे. भाटघर, नीरा देवघर व वीर धरण १०० टक्के भरल्याने वीर धरणाखाली असलेल्या नीरा डावा व नीरा उजवा कालव्याच्या सिंचनावर अवलंबून असणा-या तसेच नीरा नदी काठावरील शेतक-यांची चिंता मिठत असते. त्यामुळे पुणे, सातारा , सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीर धरण वरदाण ठरत आहे.

वीर धरणाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने गुरूवारी (दि.१३) सकाळी सव्वा दहा वाजता ६ हजार ९०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर वीर धरण दुपारी दोन वाजता ९९.६३ टक्के भरल्याने वीर धरणाचे तीन दरवाजे चार फुटांनी उचलून १४ हजार ६७२ क्युसेक्स प्रतिसेकंदाने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. मात्र नीरा खो-यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरूच राहिल्याने गुरूवारी (दि.१३) दुपारपासून वीर धरणात सुमारे २४ हजार क्युसेक्सने पाण्याची आवक होत राहिली. त्यामुळे गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता वीर धरणातून २३ हजार १२० क्युसेक्सने व विद्युत गृहातून ८०० क्युसेक्स असा २३ हजार ९२० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला.

नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वीर धरणातून गुरूवारी (दि.१३) संध्याकाळी पाच वाजता २३ हजार ९२० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याने पुरंदर तालुक्यातील जेऊर, पिंपरेखुर्द, नीरा तसेच बारामती तालुक्यातील निंबुत, मुरूम, को-हाळे खुर्द अशा नीरा नदी काठावरील पुणे , सातारा , सोलापुर जिल्ह्यातील विविध गावांना सतकर्तेचा इशारा जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like