24 तास पाणी पुरवठा योजनेचे ‘3 तेरा’, 300 मीटर नागरिकांनी काढून टाकले, योजनेचे भवितव्य ‘अंधकारमय’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत धानोरी, गणेशनगर परिसरात बसविण्यात आलेले जवळपास 300 पाणी मिटर नागरिकांनी काढून टाकले आहेत. मतदारांना खुश करण्यासाठी एका माननियांच्या पतिने उद्युक्त केल्यानंतर नागरिकांनी हे मिटर काढल्याची माहिती समोर येत असल्याने या योजनेचे भवितव्य अंधारमय दिसत आहे. दरम्यान, मिटर काढल्या प्रकरणाचा तपशिल गोळा करून लवकरच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोठ्या प्रमाणावर होणारी पाणी गळती आणि चोरी मुळे आजही शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. शहराची भौगोलिक रचना आणि शहराचा होणारा विस्तार हे देखील यामागील एक प्रमुख कारण आहे. यासाठी महापालिकेने समान पाणी पुरवठा योजना आणली. या योजेनेअंतर्गत नव्याने पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन आणि पाण्याचे ऑडिट व्हावे यासाठी मिटर बसवण्यास जवळपास सर्वच पक्षांनी मान्यता दिली आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या या योजनेच्या कामाला 2016 मध्ये सुरुवात झाली आहे.

या योजनेअंतर्गत टाक्यांचे काम बऱ्यापैकी प्रगती पथावर आहे. तर काही भागात पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली असून घरोघरी पाण्याचे मिटर ही बसविण्यात येत आहेत. पाणी वाटपाच्या विभागानुसार धानोरी, गणेशनगर परिसरात एका विभागात सुमारे साडेचार हजार आधुनिक मिटर ही बसवण्यात आले आहेत. जोपर्यंत सर्व योजनेचे काम पूर्ण होऊन कार्यन्वित होत नाही तोपर्यंत मिटरद्वारे घेण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल आकारण्यात येणार नाही, अशीच ही योजना आहे.

परंतु यानंतरही मतांचे राजकारण करण्यासाठी काही माननीय व त्यांचे कार्यकर्ते नागरिकांमध्ये मीटरची भिती निर्माण करत आहेत. तुम्ही मिटर काढून टाका असे नागरिकांना उद्युक्त करत आहेत. त्यामुळे धानोरी, गणेशनगर मधील जवळपास 300 नागरिकांनी मिटर काढून घरात ठेवले आहेत. तर काही मंडळींनी मिटर ला बायपास करत अलीकडील बाजूने कनेक्शन घेतले आहे, ज्यामुळे बिलच येणार नाही.

शहरात सुमारे 3 लाख मिटर बसवण्यात येणार आहेत. जर सर्वच भागात नागरिकांनी ही पद्धत अवलंबल्यास शहरातील पाणी वापराचे आणि गळतीचे ऑडिटच करता येणार नाही. याचा परिणाम पाणी वाटपावर होणार असून शहरातील पाणी समस्या कायम राहणार आहे, असे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

दरम्यान, याप्रकरणी पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धानोरी, गणेश नगर परिसरात काही नागरिकांनी मिटर काढून ठेवल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मिटर काढून ठेवल्या प्रकरणी तपशील गोळा करण्यात येत असून याप्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.

Visit : Policenama.com