राज्यात ‘महायुती’चं सरकार अन् मुख्यमंत्री फडणवीसच, सेनेकडून अद्याप प्रस्ताव नाही पण आमची दारं 24 तास उघडी : चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप सुटला नाही. पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम आहे. तर शिवसेनेला मुख्यमंत्री आणि महत्त्वाची पदं देण्यास भाजपा राजी नाहीये. त्यामुळे सत्तास्थापनेचं घोड अडलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा प्रश्न आ वासून उभा आहे. या सर्व पार्श्वभुमीवर भाजपा नेत्यांची महत्त्वाची बैठक आज दुपारी वर्षा बंगल्यावर पार पडली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे 24 तास उघडी असल्याचे सांगत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचे ठरले असून राज्यात लवकरच युतीचे सरकार स्थापन करण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले. मात्र, बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्यावर चर्चा झाली हे त्यांनी सांगण्यास नकार दिला.

लवकरच गोड बातमी –

राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे भाजपच्या कोअर कमेटीची बैठक आज वर्षा बंगल्यावर आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लवकरच गोड बातमी येईल असे सांगत युतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला. तसेच या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेसंदर्भात आणि प्रस्तावाबात जाहीरपणे बोलू शकत नाही आणी सांगू शकत नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते.

Visit : Policenama.com