समान पाणी पुरवठा : ‘एल अ‍ॅन्ड टी’ कंपनीचे कर्मचारी मिटरसाठी पैसे उकळतायेत, नगरसेविका मंजुषा नागपुरेंकडून प्रकरणाचा ‘पर्दाफाश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समान पाणी पुरवठा योजनेसाठी पाईप लाईन आणि घरोघरी मिटर बसवणाऱ्या एल अँड टी कंपनीचे कामगार मिटर बसवण्यासाठी नागरिकांकडून 500 रुपये उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांच्या तक्रारीमुळे खातरजमा केल्यानंतर नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर या कामगारांनी काही नागरिकांचे पैसे परत केले. बेकायदेशीररित्या नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या एल अँड टी कंपनी विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी नागपुरे यांनी केली आहे.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चाललेल्या कामांचा नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी आढावा घेतला व प्रत्यक्ष काही ठिकाणी जाऊन पाहाणी केली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. नागपुरे म्हणाल्या, की पुणे महानगरपालिकेची अत्यंत महत्वाकांक्षी अशी 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेअंतर्गत, प्रभाग क्रमांक 34 मध्ये कामे चालू आहेत. यामध्ये हिंगणे खुर्द आणि सनसिटी परिसरात एकूण 3 पाण्याच्या टाक्यांचे काम चालू आहे या दोन्ही ठिकाणी पुणे मनपा व L&T च्या अधिकाऱ्यांसमवेत जाऊन पाहणी केली व चाललेल्या कामांचा आढावा घेतला. त्या वेळी असे निदर्शनास आले की एल अँड टी, नागरिकांकडून मीटर जोडणीचे आणि घरापासून मेन लाइन पर्यंत पाईपलाईन टाकायचे शुल्क वसूल करत आहे. वास्तविक पाहता, नागरिकांनी पाण्याच्या कनेक्शनचे पैसे पुणे महानगरपालिकेकडे पूर्वी म्हणजे नवीन कनेक्शन घेताना भरलेले असतात आणि पाईपलाईनचा खर्च सुद्धा केलेला असतो.

24 बाय 7 योजने अंतर्गत जर सार्वजनिक रस्त्यात असलेल्या मुख्य नलिकेपर्यंत पाईपलाईन बदलण्याची गरज असेल तर तो खर्च नागरिकांकडून वसूल करणं चुकीचं आहे. एल अँड टी सोबत केलेल्या करारात याचा उल्लेख नाही. पुणे महानगरपालिकेने एल अँड टी कंपनी वर कारवाई करावी आणि ज्या नागरिकांकडून शुल्क घेतले असतील त्यांचे पैसे परत देऊन टाकावेत अशी मागणी नागपुरे यांनी केली.
याच बरोबर टाक्यांचे व नेटवर्किंगचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना नागपुरे यांनी केल्या. प्रभागात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो व आठवड्यातून एकदा पाणीकपात असते यामुळे लोकांना त्रास होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी देखील अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा –