Coronavirus : ‘गर्लफ्रेंड’ला भेटण्यासाठी ‘क्वारंटाईन’मधून पळाला ‘संशयित’ रुग्ण

मदुरै/ तामिळनाडू : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी काही जण बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. तामिळनाडूच्या मदुरै जिल्ह्यामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मदुरै जिल्ह्यामध्ये क्वारंटाईनमध्ये असलेल्या 24 वर्षीय संशयित तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी क्वारंटाईनमधून धूम ठोकली.

हा तरूण काही दिवसांपूर्वीच दुबई येथून आला होता. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आल्याने त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. क्वारंटाईनमध्ये असताना तेथील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून त्याने धूम ठोकली. कोरोना संशयित क्वारंटाईमधून पळून गेल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला.

क्वारंटाईनमधून पळून गेलेल्या तरुणाला पोलिसांनी शिवगंगा जिल्ह्यातील त्याच्या मैत्रिणीच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सांगितले की, मुलीच्या आई-वडीलांना आमचे प्रेमसंबंध मान्य नाहीत. त्यामुळे गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पळून आल्याचे सांगितले.क्वारंटाईनमधून पळून गेल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तरुणाने आपल्या गर्लफ्रेडची भेट घेतल्याने तिला देखील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून शुक्रवारी कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या 700 वर पोहचली आहे. तामिळनाडूमध्ये नव्याने 6 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तामिळनाडूमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 35 झाली आहे. कोरोनामुळे तामिळनाडूला लागून असलेल्या कर्नाटकामध्ये एका 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या 18 वर पोहचली आहे.