केरळमध्ये क्लार्कला लागली 12 कोटींची लॉटरी

पोलिसनामा ऑनलाईन – केरळमध्ये इडुक्की जिल्ह्यातील छोट्याश्या गावात राहणार्‍या 24 वर्षीय अनंथू विजयनला तब्बल 12 कोटींची लॉटरी लागली आहे. लॉटरीमुळे तो रातोरात करोडपती झाला आहे. केरळ सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणार्‍या ओणम विशेष थिरुवोनम बम्पर 2020 लॉटरीचा निकालात तरुणाला लॉटरी लागली आहे.

इडुक्कीमधील थोवालामधील कट्टपाना येथे राहणारा अनंथू हा सध्या एर्नाकुलम येथील कडवनाथ मंदिरामध्ये क्लार्क म्हणून काम करतो. त्याचे वडील घरांना रंगकाम करण्याचे काम करतात. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये त्याच्या बहिणीची नोकरी गेली. कोच्चीमध्ये एका खासगी कंपनीत अकाऊटंट म्हणून काम करणारी बहीण बेरोजगार झाली होती. माझ्या तिकिटावरील क्रमांक पाहिल्यानंतर मी एवढी मोठी लॉटरी जिंकलोय यावर विश्वास बसण्यासाठी मला काही तास लागले, अशी प्रतिक्रिया अनंथूने दिली आहे. लॉटरी लागल्यानंतर मला रात्रभर झोपच आली नाही. सकाळी उठल्या उठल्या मी घरी फोन करुन याबद्दल माहिती दिली. तर घरच्यांचाही पहिल्यांदा यावर विश्वास बसला नाही, असे अनंथूने सांगितले. अनंथूने मंदिराजवळच बसणार्‍या लॉटरी विक्रेत्याकडून तिकिट विकत घेतले होते. कर आणि इतर रक्कम वजा करुन अनंथूला 7 कोटी 56 लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.