‘गिरवू शिवरायांचे धडे, मराठी पाऊल पडते पुढे’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या 24 व्या स्मृती सोहळ्याअंतर्गत लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित, मातोश्री नर्मदाबाई पोपटराव ढगे विद्यालय, रासेगाव येथील अवघ्या बारा वर्षाची विद्यार्थिनी कु. साक्षिदीदी ढगे हिने आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने संपूर्ण श्रोत्यांना भारावून टाकले.

शिवचरित्र खऱ्या अर्थाने अभ्यासून तसेच विविध माध्यमातून आजच्या पिढीसमोर उभे करणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात शिवछत्रपतींचा आदर्श बाळगताना प्रत्येकाने शिवचरित्र हा आपल्या जगण्याचा विषय केल्यास हाताश न होता अनेक समस्यांशी आपण समर्थपणे लढू शकतो. छत्रपती शिवाजी राजे आपल्या बोलण्या चालण्यातून व वागण्यातून रयतेवर वेगळीच छाप पाडत असत. जिजाऊ या केवळ शिवछत्रपतींच्या आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या आई होत्या असे प्रतिपादन साक्षीने व्याख्यानातून केले. छत्रपती शिवराय, जिजाऊ व शंभूराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

व्याख्यातिचा परिचय करून देताना रमेश सोनवणे यांनी सांगितले की, साक्षीची 70 पेक्षा अधिक व्याख्याने झाली असून पुढील व्याख्यान हे 19 फेब्रुवारीला स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवजयंती निमित्त होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य अशोक क्षिरसागर, संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पं.स.सदस्या रंजना पाटील, संचालिका निता पाटील, पुष्पाताई दरेकर, शंतनू पाटील, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, लक्ष्मण मापारी, बाळासाहेब ढगे, प्रकाश ढगे, रावसाहेब ढगे ,दिलीप देसाई, देवेंद्र मुनी मानभाव, प्राचार्य बाबासाहेब गोसावी, मुख्याध्यापिका सुधा आहेर, मुख्याध्यापक अनिस काजी, पर्यवेक्षिका संजीवनी पाटील, रोशनी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत साबळे तर आभार कौतिक आवारे यांनी मानले.