२५ एकर शेतातील ऊस जळून खाक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – शेवगाव तालुक्यातील कर्हेटाकळी शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटने तब्बल पंचवीस एकर ऊस शेतात जळून खाक झाला. दुष्काळी परिस्थितीत झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, सोमवारी दुपारी कारभारी गोबरे, गणेश कोठुळे, आसाराम गोबरे हे शेतकरी आपल्या ऊस पिकाला पाणी देत असताना, शेजारील उसाला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आग विझविण्यासाठी त्यांनी या उसाच्या फडाकडे धाव घेतली. परंतु, वेगाच्या वार्‍यामुळेे त्यांना तेथे पोहचेपर्यंत आगीने एक एकर उसाला वेढा घातला. त्यामुळे या शेतकर्‍यांनी खानापूर येथे कचरू गायके यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली.

गायके यांच्यासह दोन-तीनशे शेतकर्‍यांनी कर्‍हेटाकळी शिवारात घटनास्थळी आग विझविण्यासाठी धाव घेतली. तोपर्यंत पाच एकर उसाला आगीने वेढा घातला होता. शेतकर्‍यांनी ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, ऊन व वार्‍यामुळे ते अशक्य झाल्याने ही आग भडकतच राहिली.

अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ज्ञानेश्‍वर व गंगामाई साखर कारखान्यांच्या अग्निशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. ज्ञानेश्‍वर कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी येण्यास एक तास लागला. तोपर्यंत वीस एकर उसात आगीचा डोंब पसरला होता. त्यात बंबाला फडात जाण्यासाठी रस्त्याची अडचण निर्माण झाली. दोन-तीन तासांनंतर खानापूर व कर्‍हेटाकळी येथील शेतकरी व अग्निशामक बंबाच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आली.