Coronavirus : ‘कोरोना’ वॉरियर्सचा मृत्यू झाल्यास 25 लाखाचं सानुग्रह अनुदान, राज्यातील ‘या’ जि.प. चा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील विविध भागात काम करीत असताना कोरोना योद्धाचा कामादरम्यान मृत्यू झाल्यास नंदुरबार जिल्हा परिषद संबंधिताच्या कुटुंबियांना 25 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांसह आशा, अंगणवाडी सेविका आणि अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी ग्रामीण पातळीवर प्रत्यक्ष कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षेसह त्यांना त्यांच्या कामात प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सहा तालुका आरोग्य अधिकारी, 152 वैद्यकीय अधिकारी, 104 सहाय्यक अधिकारी, 52 प्रशासन अधिकारी, 51 औषध निर्माता, 74 पुरुष आरोग्य सहाय्यक, 53 स्त्री आरोग्य सहाय्यिका, 140 आरोग्य सेवक, 330 आरोग्य सेविका, 2342 अंगणवाडी कार्यकर्ती आणि 1872 आशा कर्मचारी सेवा बजावत असल्याचे सांगितले.
आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्यां आणि मदतनीस, आशा कार्यकर्त्यां या सर्वाच्या माध्यमातून जनजागृती करणे, स्वच्छता मोहीम राबविणे अशी विविध कामे केली जात आहे. प्रत्येक गावात निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत करणे, ग्रामरक्षक दलाची स्थापना करणे, रोजगार हमी योजनेतंर्गत कामे सुरु करणे, स्वस्त धान्य धान्य दुकानांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तुंचा सुरळीत पुरवठा करणे, अशी कामे केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.