शिबिरातील तपासणीत २५ टक्के मुंबईकरांमध्ये आढळला मधुमेह

पोलीसनामा ऑनलाइन – कामाच्या व्याप वाढत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, किडनी विकार आणि टीबी या आजारांचे वाढत चालले आहे. वेळीच निदान झाले नाही तर हे आजार जीवघेणे ठरू शकतात. यासाठीच मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहा आरोग्य शिबीरे भरविली होती.यामध्ये ५९० लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी २५ टक्के लोकांना मधुमेह असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.

मुंबई महापालिकेने माहीम, मालाड, कुर्ला, शीव आणि चेंबूर-गोवंडी या परिसरात ही शिबीरे भरवली होती. तसेच झोपडपट्ट्यांमध्येही शिबीर घेण्यात आले. या शिबीरात असंसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रीत करत ३० वर्षांवरील नागरिक तसेच गर्भवती स्त्रिया यांचीही तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून २५ टक्के लोकांना मधुमेहाची लागण झाल्याचे समोर आले. तर २६ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या होती. असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यासाठी मुंबईत सहा वैद्यकीय शिबीरे भरवण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने रक्त चाचण्या करण्यात आल्या.

यामध्ये सहभागी झालेल्या २५ टक्के लोकांना मधुमेह होता. शिवाय महिलांची पॅप-स्मिअर चाचणी करण्यात आली असून एका महिलेला कर्करोग असल्याचे निदान झाले. तर अन्य महिलांचे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. मागील काही वर्षांपासून असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांना शोधण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. या शिबीरांत आढळून येणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारांचा सल्ला आणि प्राथमिक औषधोपचार दिले जातात. याशिवाय मुंबईत आणखीन ३०० वैद्यकीय शिबीर भरवण्याचा पालिका विचार करत आहे. यासाठी निधीची गरज असल्याने पालिकेला याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. निधी मिळाल्यानंतर ही शिबीर भरवली जाणार आहेत.

महापालिकेद्वारे काही वर्षांपूर्वी पालिकेची चार रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्याचे सर्वेक्षण कऱण्यात आले होते. यात चार प्रमुख रुग्णालयांमध्ये ५ लाख ५९ हजार ९५४ रुग्णांपैकी १ लाख ३० हजार २७ रुग्णांना मधुमेह असल्याचं निदान झाले होते. तर १ लाख २७ हजार ५५० रुग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले होते. मधुमेही रुग्णांची संख्या मुंबईत वाढत आहे. सध्याची जीवनशैली यास कारणीभूत असून कामाच्या ताणामुळे अनेक लोक स्वतःच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते.