अज्ञात रोगाच्या साथीत २५ मेंढ्यांचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील शेतकरी विशाल लक्ष्मण करांडे व संदीप करांडे यांच्या मेंढ्यांच्या कळपातील २५ मेंढ्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्या आहेत. गेल्या ३ दिवसांपांसून या रौगाने थैमान घातले आहे. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानकपणे पसरलेल्या रोगाने मेंढपाळांत घबराट पसरली आहे.

वडगाव गुप्ता हे गाव नगर शहर तसेच औद्योगिक वसाहतीच्या जवळच असले तरी या गावच्या परिसरात शेतकरी वर्ग मोठा असून शेतीबरोबर पाळीव जनावरे पाळून शेतकरी आपली आर्थिक गरज भागवत असतात. गावात दूध व्यवसाय करणारा वर्गही मोठा आहे. गावातील विशाल करांडे व संदीप करांडे यांच्या घरी गेल्या अनेक वर्षापासून मेंढीपालनाचा व्यवसाय केला जातो. त्यांच्याकडे ११० मेंढ्या, १७ शेळ्या, ४० कोकरे होती.

गेल्या ३- ४  दिवसांपासून त्यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय संकटात सापडला आहे. रानात चरावयास सोडलेल्या मेंढ्या अचानकपणे मृत्युमुखी पडू लागल्या आहेत. दि.३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत ३ शेळ्या, २ कोकरे व २५ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. याच  मेंढ्यांची छोटी कोकरे असून मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या पालन पोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या तीन दिवसात मेंढ्यांवर उपचारासाठी ५० ते ६० हजारांचा खर्च करूनही आणखी काही मेंढ्या मृत्युमुखी पडण्याच्या मार्गावर आहेत.

तीन लाखांचे नुकसान

सध्या बाजारात पूर्ण वाढ झालेल्या शेळ्या मेंढ्यांचा वाढलेला दर पाहता करांडे यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ मेंढी पालनावर सुभेदार यांचे कुटुंब अवलंबून आहे. तरी  संबंधित विभागाने याची तातडीने याची दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

व्हिसेरा पुण्यातील प्रयोगशाळेत

अज्ञात रोगाने मृत्यूमुखी पडलेल्या मेंढ्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनेचा पंचनामा करण्यात आला अाहे. त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे.