Bhosari News : चारजणांकडून चोरीच्या 10 लाखांच्या 25 दुचाकी जप्त

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी पोलिसांनी चार वाहन चोरांकडून 10 लाख 55 हजार रुपयांच्या 25 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक करून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर ग्रामीण आणि नाशिक ग्रामीण परिसरातून दुचाकी चोरल्या असून 22 गुन्हे उघडकीस आले आहेत. अजित अमृता साबळे (वय-25 रा. मु. मवेशी पो. राजुर ता. अकोले, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासह इतर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून प्रत्येक पोलिस ठाण्यात वाहन चोरीच्या तक्रारी येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व पोलीस ठाणे आणि पथकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे आणि पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांची दोन पथके तयार केली.

पोलिस उपरनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या पथकातील पोलीस शिपाई चेतन साळवे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सपाळा रचून आरोपी अजित साबळे आणि त्याच्या अल्पवयीन साथिदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी 18 महागड्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकी पैकी 11 दुचाकी अकोले परिसरात ठेवल्याची माहिती आरोपींनी दिली. पोलिसांनी अकोले परिसरातून दुचाकी जप्त करून 17 गुन्हे उघडकीस आणले. तर सहायक पोलीस निरीक्षक कैलासे यांच्या पथकाने दोन अल्पवयीन वाहन चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या असून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपींनी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 4, सांगवी 2, चाकण 2, चिखली 1, विश्रांतवाडी 1, खडक 2, नारायणगाव 2, आळेफाटा 1, अकोले (अहमदनगर) 2, संगमनेर शहर 1, राजुर 2, घोटी (नाशिक ग्रामीण) 1, कोथरुड 1, इतर दोन अशा एकूण 10 लाख 55 हजार रुपयांच्या 25 दुचाकी जप्त केल्या असून 22 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त इंचक इप्पर, साहयक पोलीस आयुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलिस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलावडे, पोलीस हवालदार चंद्रकांत तिटकारे, पोलीस नाईक अजय डगळे, गणेश हिंगे, पोलीस शिपाई बाळासाहेब विधाते, सागर जाधव, सागर भोसले, चेतन साळवे, अशोक ताथवडे, संतोष महाडीक, समीर रासकर, आशिष गोपी, सुमीत देवकर, गणेश सावंत यांच्या पथकाने केली.