दिवाळीत रिअल इस्टेटमध्ये 250 कोटींचे व्यवहार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी पसरली होती. मात्र, दिवाळीमध्ये नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात सरासरी अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, तब्बल तीन हजार ६३४ दस्तांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे या उलाढालीचा विचार केला तर मंदी ह्टल्याचे संकेत मिळत आहेत.

दस्त नोंदणीची आकडेवारी पाहता गेल्या वर्षाच्या तुलनेत ७१७ अधिक दस्त नोंदविण्यात आले आहेत. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर तब्बल सात महिने रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती. आर्थिक मंदी कधी संपेल, याबाबत स्पष्ट होत नव्हते. परंतु दिवाळीच्या काळात नोव्हेंबर महिन्यात सतरा दिवसांत झालेल्या आर्थिक उलाढालीचा विचार करता रिअल इस्टेट क्षेत्रावरील मंदी हटत असल्याचे दिसून येत आहे. जमीन, फ्लॅट, बंगला, गाळे आदी मालमत्तांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे होते. नाशिक जिल्ह्यात सात कार्यालये असून, त्यातील पाच कार्यालये शहरात आहेत. सातही कार्यालयांमध्ये १ ते १७ नोव्हेंबर या १७ दिवसांच्या कालावधीमध्ये तीन हजार ६३४ दस्तांची नोंदणी झाली.

गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये दोन हजार ९१७ दस्तांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षी शासनाला २३ कोटी चार लाख रुपये महसूल मिळाला होता, तर या वर्षी २५.७० कोटी महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्क सहा टक्के होते. या वर्षी तीन टक्के करण्यात आले.

गतवर्षीच्या तुलनेत अधिक दस्त नोंदणी
कोरोनामुळे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मंदी आली होती. मात्र, दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक दस्त नोंदणी झाली. यातून शासनाला २५ कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाल्याचे नाशिकचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी सांगितले.

अशी झाली दस्तांची नोंदणी (१ ते १७ नोव्हेंबर, कोटी रुपयांमध्ये)

आर्थिक वर्ष                     २०१९                            २०२०
एकूण दस्त संख्या             २,९१७                            ३,६३४
एकूण मुद्रांक शुल्क           २०,६१,१८,०७३           २१,२९,१२,२१०
एकूण नोंदणी फी              २,४२,९५,५२०             ४,४१,०४,७५०

एकूण                            २३,०४,१३,५९३         २५,७०,१६,९६०