नाशिक जिल्ह्यातून २५ हजार मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात; मात्र, द्राक्ष निर्यात प्रोत्साहन योजना बंद झाल्याने द्राक्ष दराला फटका

लासलगाव : द्राक्ष निर्यात सुरू झाली असून २०४९ कंटेनर मधून २६९८९ मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असून एकट्या नाशिक मधून २५ हजार ४२० मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असून उरवरीत सांगली,सातारा,पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातुन द्राक्ष निर्यात झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ८९७ मॅट्रिक टनांनी निर्यात कमी झाली आहे.

अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झालेले असताना अनेक अडथळ्यांवर मात करत द्राक्ष निर्यात सुरू आहे मात्र “गरिबीमे आटा गिला ” या उक्ती सारखी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. द्राक्ष निर्यातीसाठी प्रोत्साहन म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली योजना बंद झाल्यामुळे इतर देशांच्या स्पर्धेत भारतातील निर्यातदार आणि बागायतदार प्रभावित झाले आहेत. परिणामी, कमी दराचा थेट फटका बागायतदारांना बसत असून, आहे. तर नवीन आलेल्या ‘आरओडीटीईपी’योजनेत काही स्पष्टता नसल्याने निर्यातदारांचे म्हणणे आहे.

अवकाळीच्या झळा सोसल्यानंतर द्राक्ष काढणी हंगाम सुरू झाला आहे. आता दोन पैसे पदरी पडतील अशी अपेक्षा असताना केंद्र सरकारच्या धोरणामुळे हंगाम आंबट असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारकडून सुरू असलेली मर्चंडाइस एक्स्पोर्टस् फ्रॉम इंडिया स्कीम(MEIS) ३१ डिसेंबरपासून बंद झाल्याने निर्यातदारांना प्रति कंटनेर मागे ७ टक्के मिळणारे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे निर्यात सुरू असली तरी कमी दरात द्राक्ष खरेदी सुरू असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

यंदाची प्रमुख देशातील द्राक्ष निर्यात
नेदरलँड – १४३८ कंटेनर – १८८०१ मॅट्रिक टन
युनायटेड किंडम- ३०३ कंटेनर – ४१४४ मॅट्रिक टन
जर्मनी -१६२ कंटेनर – २१११ मॅट्रिक टन
फिनलेंड -३५ कंटेनर – ४३८ मॅट्रिक टन
लिथुनिया -२१ कंटेनर – ३११ मॅट्रिक टन
डेन्मार्क -२० कंटेनर – २५१ मॅट्रिक टन