दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 25 हजार महिलांचे ‘अथर्वशीर्ष’ पठण (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पहाटेची वेळ मधूनच पावसाची एखादी सर येत असतानाच ओम नमस्ते गणपतये, ओम गं गणपतये नम: असा स्वर उमटला आणि संपूर्ण आसमंत भक्तीमय होऊन गेले. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीसमोर मंगळवारी पहाटे तब्बल २५ हजाराहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपारिक वेशात पहाटे ५ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. गणरायाच्या नामाचा जयघोष करत ऋषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या महिलांचा आनंद पाहण्याजोगा होता.

तब्बल ३३ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा. याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. केवळ १०१ महिलांपासून सुरु झालेल्या उपक्रमात आज २५ हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्यास विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या आणि परदेशी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –