कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ! काही तासात 26 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरु आहे. अशातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोरोना झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या काही तासातच डॉक्टराचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील गुरू तेज बहादूर रुग्णालयात ही घटना घडली आहे. कोरोनानंतर झालेल्या लक्षणांमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

डॉ. अनस मुजाहिद (वय 26 रा. भगिरथी विहार, दिल्ली ) असे मृत्यू झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुजाहिद यांची ड्युटी कोरोना सेंटर म्हणून घोषित केलेल्या जीटीबी रुग्णालयात होती. त्यांनी जानेवारी महिन्यात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप केली होती. डॉ. मुजाहिद यांनी OB-Gyn वार्डमध्ये शनिवारी आपली ड्युटी केली. डॉ. मुजाहिद यांचे सहकारी डॉ. आमिर सोहेल यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी डॉ. मुजाहिद हे इफ्तारसाठी आपल्या घरी गेले होते. त्यांना लीला हॉटेलमध्ये रुम मिळाली होती, इफ्तारनंतर हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी त्यांना ताप आल्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात कोरोनाची रॅपिड अँटिजन टेस्ट केली.

या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अचानक बेशुद्ध होऊन जमीनीवर कोसळले. त्यानंतर आम्ही त्यांना कॅज्युअलिटी वार्डात दाखल केले. त्यावेळी ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यांचे सीटी स्कॅन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यात त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. तात्काळ न्यूरोलॉजिकल विभागात हलविले. मात्र तिथे रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला, असे डॉ. सोहेल यांनी सांगितले.