२६ वर्षांच्या तरूणीच्या छातीत तब्बल १५ सेंमीची ‘गाठ’

पोलिसनामा ऑनलाईन टीम-  बिहारमधील एका २६ वर्षांच्या तरूणीच्या छातीत २०१८ साली एक गाठ झाली. या गाठीमुळे तिला घराबाहेर पडणेदेखील अवघड होऊन बसले होते. लाज वाढत असल्याने तिने कुणालाही सांगितले नाही. मात्र, मे २०१८ मध्ये तिला असह्य अशा वेदना होऊ लागल्याने ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तिच्यावर लम्पेक्टोमी करून ही गाठ काढून टाकली. परंतु, त्यानंतर ६ महिन्यांतच तिला अजून एक गाठ छातीत असल्याचे जाणवले. फेब्रुवारी २०१९ मध्ये डॉक्टरांनी तिला मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. वोक्हार्टमध्ये बायोप्सी केल्यानंतर तिच्या डाव्या स्तनामध्ये १५ सेमीचा फायब्रोडेनोमा असल्याचे निदान झाले.

याबाबत वोक्हार्ट रूग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षापर्यंतच्या महिलांमध्ये आढळणारे फायब्रोडेनोमा हे सौम्य ट्युमर असतात. पौगंडावस्थेतील लोकसंख्येमध्ये फायब्रोडेनोमाचे प्रमाण २.२% आहे. स्तनांमध्ये आढळणाऱ्या गाठींपैकी या प्रकाराचे प्रमाण ६८% असते आणि बायोप्सी करून काढलेल्या स्तनांच्या विकारस्थळापैकी ४४-९४% प्रमाण फायब्रोडेनोमांचे असते.
याबाबत मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ऑन्कोसर्जन डॉ. मेघल संघवी यांनी सांगितले की, फिलोड्स ट्युमर सौम्य किंवा मॅलिग्नंट कर्करोगयुक्त असू शकतो. त्यामुळे त्यावरील शस्त्रक्रिया ही फायब्रोडेनोमावरील शस्त्रक्रियेपेक्षा वेगळी असते. त्यासाठी केवळ लम्पेक्टॉमी पुरेशी नसून नीट मार्जिन ठेवून रुंद चीर देणे आवश्यक असते. या रुग्णाचा ट्युमर पाहता सिंपल मॅस्टेक्टोमीची आवश्यकता होती. याचे लक्षण म्हणजे गाठीला स्पर्श केला असता ती गाठ हलते. पौगंडावस्थेदरम्यान ही गाठ विकसित होते किंवा तरुण महिलांमध्ये ही गाठ आढळते. त्यामुळे या तरुणीला सिंपल मॅस्टेक्टोमी शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर स्तन पुनर्रचना (ब्रेस्ट रिकन्स्टड्ढक्शन) शस्त्रक्रिया करण्यात आली. सिंपल मॅस्टेक्टोमी शस्त्रक्रियेत तिचा डावा स्तन काढून टाकण्यात आला. शस्त्रक्रियेच्या तीन दिवसांनी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आणि आठवडाभराची विश्रांती घेण्याचा सल्ला तिला देण्यात आला. आठवड्यानंतर तिने दैनंदिन कामे सुरू केली. आता ती कामावर रुजू झाली आहे.

शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या या महिलेने सांगितले की, माझ्या डाव्या स्तनामध्ये गाठ पाहून मी खूप घाबरले होते. मला या परिस्थितीतून बाहेर पडायचे होते. आयुष्य पूर्वीप्रमाणेच सामान्य व्हावे अशी इच्छा होती. एका स्तनासह जगणे सोपे नाही, हे मला माहीत आहे. पण मी खुश आहे आणि वोक्हार्ट हॉस्पिटलने दिलेल्या सहकार्याबद्दल आणि पाठींब्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. माझ्यासारख्या सर्व महिलांना मी आवाहन करते की लाजू नका, बाहेर या आणि त्याबद्दल बोला आणि योग्य वेळी योग्य उपचार घ्या.