कौतुकास्पद ! नक्षलग्रस्त भागातील अनुप्रिया बनली पहिली आदिवासी ‘कमर्शियल’ पायलट

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिशाची अनुप्रिया मधुमिता लाक्रा ही देशातील पहिली आदिवासी महिला व्यावसायिक (कमर्शियल) पायलट बनली आहे. नक्षलग्रस्त मलकनगिरी जिल्ह्यात राहणारी 27 वर्षीय अनुप्रिया लवकरच इंडिगो एअरलाइन्समध्ये सह-पायलट म्हणून काम करेल.

लहानपणापासूनच अनुप्रियाचे पायलट बनण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अभियांत्रिकीचे शिक्षण सोडले आणि 2012 मध्ये विमानचालन (एव्हिएशन) अकादमीमध्ये प्रवेश घेतला. पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न सात वर्षांच्या प्रशिक्षणानंतर पूर्ण झाले. या महिन्यात इंडिगो एअरलाइन्समध्ये सह-पायलट म्हणून सामील झाली आहे.

अनुप्रियाचे वडील मोरिनिस लाक्रा हे ओडिशा पोलिसात हवालदार आहेत. तर आई जामज यास्मिन गृहिणी आहे. अनुप्रियाचे दहावी पर्यंतचे शिक्षण काॅन्व्हेंट स्कूलमध्ये झाले असून बारावीपर्यंतचे शिक्षण सेमिलिदुगा स्कूलमध्ये झाले आहे. अनुप्रियाच्या या कामगिरीबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तिचे अभिनंदन केले आहे. अनुप्रियाचे कौतुक करताना ते म्हणाले की, ‘अनुप्रियाने मिळवलेल्या यशाबद्दल मी आनंदी आहे. तिचे निरंतर प्रयत्न, चिकाटी आणि तिने मिळवलेले यश अनेकांना प्रेरणा देत राहील. एक सक्षम पायलट म्हणून अनुप्रियाला अधिक यश मिळावे अशी शुभेच्छा. ‘

आरोग्यविषयक वृत्त –