COVID-19 : देशात एकाच दिवसात आढळले ‘कोरोना’चे 27114 नवे पॉझिटिव्ह, महाराष्ट्रासह ‘या’ 6 राज्यांनी वाढवलं ‘टेन्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात पहिल्यांदाच कोरोनाचे 27 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 27,114 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 519 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या नवीन आकडेवारीत दिल्लीला दिलासा मिळाला आहे, तर कोरोनाची प्रकरणे पूर्वी कमी असलेल्या 6 राज्यांत 50 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहेत.

गेल्या एका दिवसात 27,114 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर आता देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 8 लाख 20 हजार 916 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात 2,83,407 सक्रिय रूग्ण आहेत तर 5,15,385 रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाने आतापर्यंत 22,123 लोक मरण पावले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे कारण आतापर्यंत ज्या राज्यात कोरोनाची प्रकरणे कमी आहेत अशा रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

गेल्या एका आठवड्यातील आकडेवारी पाहिल्यास 6 राज्यांत कोरोना रूग्णांची संख्या 50 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका आठवड्यात कर्नाटकात कोरोना रूग्णांच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर आसाम आणि ओडिशामध्ये नवीन कोरोना रुग्णांची संख्या 80 टक्क्यांनी वाढली आहे. बिहारमध्येही कोरोना रूग्णांच्या संख्येत 70 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, तर यूपी आणि राजस्थानमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात दिवसात 7862 नवीन प्रकरणे
शुक्रवारी देशातील कोरोना विषाणूचे केंद्र बनणाऱ्या महाराष्ट्रात संक्रमणामुळे 226 लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूची संख्या ही सर्वात मोठी आहे. त्याचबरोबर आज कोरोना विषाणूची 7862 नवीन प्रकरणे नोंदली गेली. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या 2,38,461 वर पोहोचली आहे, त्यापैकी आतापर्यंत 1,32,625 लोक बरे झाले आहेत तर 9893 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत सक्रिय केसेस 18 टक्क्यांनी झाल्या कमी
देशाची राजधानी दिल्लीतून दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या एका आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 18 टक्क्यांनी घट झाली आहे. 3 जुलै रोजी दिल्लीत 26,304 सक्रिय प्रकरणे आढळून आली होती. दहा जुलै रोजी सकाळी ही टक्केवारी 18 टक्क्यांनी घसरून 21,567 वर आली आहे.