राज्यातील 27 हजार 500 उद्योग अद्याप ‘लॉकडाऊन’च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे उद्योगचक्र बंद झाले होते. मात्र, उद्योगचक्राला गती देण्यासाठी सरकार कोसोशीने प्रयत्न करत असले तरी आजवर राज्यातील 36 हजार 623 उद्योगांपैकी फक्त 9 हजार 54 उद्योगांची धडधड सुरु झाली आहे. राज्यातील एकूण उद्योगांपैकी 28 लाख 54 हजार नोंदणीकृत कामगार आहेत. त्यापैकी फक्त 4 लाख 92 हजार 972 कामगार प्रत्यक्ष कामावर रुजू झाले आहेत. उद्योजकांसमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे. त्यामुळे अनेक कारखाने आजही लॉकडाऊनच आहेत.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करताना नॉन रेड झोनमधिल उद्योग सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली होती. 25 मे पर्यंत 6 हजार 291 उद्योग सुरु झाले आणि तिथल्या 3 लाख 68 हजार कामगारांचा हाताला काम मिळाले. तर 1 जून पासून कोरोनाग्रस्त असलेली राज्यातील प्रमुख शहरे वगळता उर्वरित ठिकाणच्या उद्योगांवरील निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. मात्र 25 मे ते 8 जून या दरम्यान जेमतेम 2700 उद्योगच सुरु झाले असून कामगारांच्या संख्येत सव्वा लाखाची भर पडली आहे. आजही 27 हजार 569 कारखानदार आणि जवळपास 23 लाख 62 हजार म्हणजे 82 टक्के कामगार कारखाने सुरु होण्याची वाट पहात आहेत.

केंद्र सरकारने लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योजकांना अर्थसाहय्य देण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र त्या कर्जवाटपाबाबतची मार्गदर्शक तत्वे अद्याप काही बँकाना प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा कर्जपुरवठा अनेक ठिकाणी सूरू झालेला नाही. तर काही बँकांनी विविध कारणे पुढे करत कर्ज पुरवठा करण्यासाठी आखडता हात घेतल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. तर काही कारखानदारांनी कारखान्यात जे उत्पादन केले जाणार आहे त्या उत्पादनांना बाजारातूनच मागणी नसेल तर उत्पादन करण्याचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित केला आहे.तर आर्थिक संकट एवढे मोठे आहे कारखान्यांना कायमस्वरूपी टाळे लावण्याचाही विचार काही उद्योजकांकडून सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.