साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी सरकारने महत्वाची घोषणा केली आहे . साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून ३ हजार ३०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून केंद्रीय कॅबिनेट बैठकीत यासंबंधीत निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या थकीत रकमेमुळे त्रस्त असलेल्या साखर कारखानदारांना या मदतीमुळे दिलासा मिळणार आहे. २ हजार ७९० कोटी आणि ५६५ कोटी अशा दोन टप्प्यात साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे . अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली.
https://twitter.com/ANI/status/1103560886688600064
देशातील ऊस उत्पादक क्षेत्रातील उद्योजकांना आणि ऊस उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.  साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी हे तिसरे मोठे पॅकेज केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने जून महिन्यात साखर उद्योगासाठी ८ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर होते. त्यानंतर, सप्टेंबरमध्ये ५५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते . कारखान्यांकडे शेतकऱ्यांची असलेली १३ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी चुकती व्हावी तसेच गाळप हंगाम २०१८ – १९ मधील ५० लाख टन साखर निर्यातीसाठी कारखान्यांना प्रोत्साहनपर रक्कम व वाहतुकीसाठी अनुदान देण्यासाठी हा निधी देण्यात आला होता. तर , आता २७९० कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.