अमरावती : बडनेऱ्यात 28 कोंबड्या दगावल्या, नागरिकांनी घेतली बर्ड फ्लूची धास्ती

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट अद्याप नियंत्रणात आलेले नसताना आता ‘बर्ड फ्लू’चे नवे संकट घोंघावू लागले आहे. महाराष्ट्रात अद्याप ‘बर्ड फ्लू’चा धोका नसल्याचे राजाचा पशुसंवर्धन विभाग सांगत असला तरी नागपूर जिल्ह्यात 500 हुन अधिक पक्षांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ गेल्या दोन दिवसात बडनेरा येथील दत्तवाडी परिसरातील 28 कोंबड्या मृत्यू पावल्या आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूची धास्ती नागरिकांमध्ये असल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत त्या मृत कोंबड्यांचे स्वॅब अमरावतीच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती डॉ. अनिल किटुकले यांनी दिली आहे.

जुन्या वस्तीतील दत्तवाडी परिसरात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील एकूण 28 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अचानक जमिनीवर कोसळून त्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश निमकर, बाळू ठवकर यांनी बडनेऱ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला याची माहिती दिली. डॉक्टरांनी तातडीने घटनास्थळी सहकाऱ्याला पाठवून कोंबड्यांच्या नाकावाटे व गुदद्वारातून स्वॅब घेण्यास सांगितले. सदर नमुने अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविले असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती डॉ. अनिल किटुकले यांनी दिली. तथापि बर्ड फ्लूचा धोका काही राज्यांत बळावल्यावरून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.